शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या स्टॉल व छोटय़ा दुकानदारांचे महापालिकेच्या मंडयांमध्ये पुनर्वसन करण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वी घेऊनही अधिकारी त्याची अंमलबजावणी करीत नाहीत. हजारो गाळे मोकळे असताना हे स्टॉलधारक रस्त्यांवर आहेत. भ्रष्ट व कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठिशी घातले जात आहे, असा आरोप करीत आयुक्तांनी शहरातील रस्ते मोकळे करावेत, नाहीतर गावी जाऊन शेती करावी, अशी टीकेची झोड भाजपचे आमदार गोपाळ शेट्टी यांनी मंगळवारी उठविली. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महत्त्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्याची आवश्यकता आहे. त्याआड येणाऱ्या स्टॉलधारकांचे मंडयांमधील रिकाम्या गाळ्यांमध्ये मोफत पुनर्वसन करण्याचा ठराव २००९ मध्ये पालिकेने केला होता. पण अधिकाऱ्यांनी काहीही केले नाही आणि आयुक्तांनीही त्यांच्यावर कारवाई केली नाही. प्रत्येकाने किती काम केले पाहिजे, याची काहीच जबाबदारी त्यांच्यावर नाही. त्यामुळे मंडयांमधील हजारो गाळे गेली अनेक वर्षे रिकामे आहेत, असा आरोप शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
महापालिकेत शिवसेना-भाजपची सत्ता असतानाही प्रशासन काम करीत नसल्याबद्दल भाजपने आयुक्त व अधिकाऱ्यांवर टीकास्त्र सोडले आहे. यासंदर्भात आयुक्त, सर्वपक्षीय गटनेते आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक तातडीने बोलवावी, अशी मागणी शेट्टी यांनी महापौर सुनील प्रभू यांच्याकडे केली आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महापालिका आयुक्तांकडे ठोस योजना असली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा