कृषीमंत्री शरद पवार यांची सूचना
अतिवृष्टीने मोठय़ा प्रमाणात नुकसान झालेल्या उमरी येथील गावकऱ्यांची व्यथा ऐकून स्तब्ध झालेल्या केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी या गावाच्या उभारणीसाठी विशेष लक्ष देण्याची सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली.
गेल्या आठवडय़ात वर्धा व यवतमाळ जिल्ह्य़ाचा दौरा करणाऱ्या कृषीमंत्री शरद पवार यांनी राष्ट्रीय महामार्गालगतच उमरी (माटे) या गावाला भेट दिली होती. १७ व १८ ऑगस्टला उमरा गावातील सर्वच लोकांचे सिंदी येथे बोटीतून स्थानांतरण करण्यात आले होते. कांढळी-उमरा या परिसरात वणा व तिच्या उपनद्यांचे जाळे पसरले आहे. त्या तुडूंब भरलेल्या, लोअर वणा धरणातून सातत्याने होणारा पाण्याचा विसर्ग व वरून कोसळणारा मुसळधार पाऊस यामुळे या गावाला बेटाचे स्वरूप आले होते. गावातील सधन कुटूंबेही अन्नान्न दशेला लागल्याचे चित्र दिसून आले. या अशा स्थितीने उमरी गावाची चांगलीच वाताहत झाली आहे. शरद पवार हे गावाच्या वेशीवर झाले असताना त्यांना माजी आमदार राजू तिमांडे यांनी नुकसानीचे स्वरूप सांगितले.
मात्र, त्याचवेळी गावातील सहकारी संस्थेचे पदाधिकारी प्रदीप माटे यांनी पवारांना प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती केली. या वेळी उपस्थित गावकऱ्यांनीही आपबिती कथन केली. संपूर्ण शेती खरडून गेलेली, शेतातील विद्युतपंप नादुरुस्त झालेले, घरांची पडझड असे चित्र पाहून पवारांनी आस्थेने मदतीबाबत विचारणा केली. त्यावर बहुतांश शेतजमिनी खरडून गेली असल्याने नुकसानीचा १०० टक्के मोबदला मिळावा, शेतीचा पोत सुधारण्यासाठी शासनाने मदत करावी, विद्युतपेटय़ा सलग दोन दिवस पाण्यात राहिल्याने त्या पूर्णत: निरुपयोगी झाल्या आहेत. त्यामुळे मीटरचा भार शेतकऱ्यांवर न टाकता विद्युत कंपनीने नवे मीटर मोफ त उपलब्ध करून द्यावे. ही दुरुस्ती तात्काळ झाल्यासच रब्बी हंगामात काही प्रमाणात शेती होऊ शकते, अशी विनंती गावकऱ्यांनी केली.
यावर पवार यांनी उपस्थित जिल्हाधिकारी नविन सोना यांना मदतीबाबत विचारणा केली. त्यांनी प्रत्यक्ष गावाचा नकाशाच पवारांपुढे उलगडला. हे गाव रेड झोन अंतर्गत येत असून स्थलांतरित करण्याची गरज आहे, असे सुचविले. मात्र, सध्या तात्काळ मदतीचे कार्य सुरू करा, असे निर्देश पवारांनी दिल्यावरच गावकऱ्यांचे समाधान झाले.

Story img Loader