शहराध्यक्षपद निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी बोलावलेली भारतीय जनता पक्षाच्या शहर शाखेची बैठक आज वादविवादांमुळे गाजली. विश्वासात न घेतल्याचा आरोप पक्षाच्या काही ज्येष्ठांनी तसेच नगरसेवकांनी विद्यमान शहराध्यक्षांवर केला. त्यामुळे प्रभाग समित्यांच्या निवडणुकांसाठी नियुक्त केलेल्या निरिक्षकांशिवाय १० जणांचे नवे मंडळ निरीक्षकांवर नियुक्त करावे लागले.
शहराध्यक्षपद निवडणुकीसाठी प्रथम प्रभाग समित्यांच्या निवडणूका होणे गरजेचे आहे. त्यासाठी पक्षाने माजी जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे यांना निरीक्षक नियुक्त केले आहे. त्यांनी मध्यंतरी बैठक घेऊन मनपाच्या ६५ प्रभागांसाठी काही निरीक्षक नियुक्त केले. या कामाचा आढावा घेण्यासाठी आज बैठक बोलावली होती. कामाचा आढावा बाजूलाच राहिला, वादविवाद व आरोपप्रत्यारोपच झाले.
शहराध्यक्ष मिलिंद गंधे, सरचिटणीस जगन्नाथ निंबाळकर तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. तसेच माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, माजी शहराध्यक्ष वसंत लोढा, सुनिल रामदासी, अनंत जोशी यांच्यासमवेत उपमहापौर गीतांजली काळे, स्थायी समिती सभापती बाबासाहेब वाकळे, नगरसेवक संगीता खरमाळे व पक्षाचे अन्य सर्व नगरसेवक, अनिल गट्टाणी, नरेंद्र कुलकर्णी आदी कार्यकर्ते बैठकीत होते. त्या सर्वानीच प्रभाग निरीक्षकांच्या कामकाज पद्धतीवर आक्षेप घेतले व परस्पर चाललेले कामकाज योग्य नाही असे सांगितले.
खरमाळे यांनी आपल्या प्रभागात कोण निरीक्षक आहे तेही माहिती नसल्याचे सांगितले. त्यानंतर सर्वानीच निरीक्षकांची नियुक्ती करताना विश्वासात घेतले नसल्याची टिका केली. निरीक्षकांनी आतापर्यंत १९ प्रभाग समित्यांच्या निवडणुका घेतल्या, त्या घरात बसूनच घेतल्या की काय, त्यांना साधे कार्यकर्तेही माहिती नाहीत, बैठका कधी घेतात, निवड कशी करतात काहीही कळवत नाहीत, याच पद्धतीने प्रभाग समित्या ताब्यात घेऊन नंतर शहराध्यक्षपद पदरात पाडून घ्यायचा काहींचा डाव आहे असाही गंभीर आरोप काही ज्येष्ठांनी केला. त्यानंतर वादविवादच सुरू झाले.
अखेरीस ढाकणे यांनी हस्तक्षेप करत १० जणांचे नवे मंडळ नियुक्त करत असल्याचे जाहीर केले. त्यात आगरकर, रामदासी, लोढा, गंधे, गट्टाणी, वाकळे आदींचा समावेश आहे. आता प्रभाग निरीक्षकांनी या १० जणांच्या मंडळाला सांगुनच प्रभाग समित्यांच्या निवडणुका घ्यायच्या आहेत. २० फेब्रुवारीपर्यंत त्यांनी हे काम करायचे आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आढावा घेऊन नंतर शहराध्यक्षपद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल असे ढाकणे यांनी सांगितले.

Story img Loader