‘लातूरची रेल्वे नांदेडला नेऊ नये’
लातूर-मुंबई रेल्वे नांदेडपर्यंत नेण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय लातूरकरांवर अन्याय करणारा असल्यामुळे त्याला विरोध करण्यासाठी कृती समितीच्या वतीने बुधवारी अर्धा दिवस लातूर बंद आंदोलन करण्यात आले.
रेल्वे अर्थसंकल्पात लातूर रेल्वेस्थानकावर कोणतीही नवीन सुविधा न देता व नवीन रेल्वे सुरू न करता मुंबई-लातूर रेल्वेसेवा नांदेडपर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर झाला. मात्र, त्यामुळे लातूर परिसरातील सामान्य प्रवाशांची गैरसोय होणार आहे. रेल्वे प्रशासनाने लातूरकरांच्या भावनांचा कोणताही विचार केला नाही. नांदेडकरांना पुणे, मुंबईला जाणारी नवीन गाडी द्यावी. लातूरहून पुण्यासाठी दररोज रेल्वे सोडावी. लातूर व उस्मानाबाद रेल्वेस्थानकांवर दादरा, कॅन्टीन, विश्रामगृह आदी सुविधा निर्माण कराव्यात, अशा मागण्या कृती समितीच्या वतीने करण्यात आल्या. अशोक गोविंदपूरकर, रवींद्र जगताप, पप्पू कुलकर्णी, अ‍ॅड. उदय गवारे, चंद्रकांत चिकटे, मोहन माने, सुधीर धुतेकर, अभय साळुंके, रघुनाथ बनसोडे, बसवराज वळसंगे, विश्वंभर भोसले आदींच्या कृती समितीने ‘बंद’चे आवाहन केले होते.
पालकमंत्री सतेज पाटील यांनीही रेल्वेमंत्र्यांना लातूर-मुंबई एक्स्प्रेस पूर्ववत ठेवण्याचे निवेदन पाठवले आहे. जिल्ह्य़ातील सर्वच लोकप्रतिनिधींनी तशी मागणी रेल्वेमंत्र्यांकडे यापूर्वीच केली आहे. रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य दिलीप माने यांनी लातूरकरांची मागणी मान्य न झाल्यास सल्लागार पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. मुंबईची रेल्वे लातूरसाठीच राहावी, या साठी लातुरातील सर्वपक्षीय मंडळी रस्त्यावर उतरली आहे. त्यांच्यासोबत सर्व व्यापारी संघटना, विद्यार्थी संघटना व सर्व सामाजिक संघटना सहभागी झाल्या आहेत. बुधवारी बंदच्या आवाहनाला शहरात अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व भागांत बंदचा परिणाम जाणवला. बंद उत्स्फूर्त असल्यामुळे बंदचे आवाहन करत फिरण्याची वेळ आली नाही. सर्व व्यापारी संघटना या बंदमध्ये सहभागी होत्या. रेल्वे प्रशासनाने लातूरकरांवर केलेल्या अन्यायाची दखल घेतली नाही तर शनिवारी दुपारी १२ वाजता लातूर रेल्वेस्थानकावर पंढरपूर-निजामाबाद रेल्वे अडविण्याचा इशारा रेल्वे बचाव संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला. लातूरची रेल्वे नांदेडला पळवण्याचा रेल्वे प्रशासनाने जो घाट घातला आहे, त्याच्या निषेधार्थ लातूरकर चांगलेच तापले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Story img Loader