संयुक्त राष्ट्रसंघ व युरोपियन कमिशनने पर्यावरणभिमुख ऊर्जा विकास प्रकल्पासाठी प्रयत्न करणाऱ्या शहरांमध्ये ठाणे शहराची प्रथम क्रमांकाचे शहर म्हणून निवड केली असून या प्रकल्पासाठी महापालिकेला एकूण एक लक्ष युरोचे अनुदानही जाहीर झाले आहे.
ग्लोबल वॉर्मिगचा धोका टाळण्यासाठी अपारंपारिक ऊर्जेचा वापर, संवर्धन आणि कार्यक्षमता कार्यक्रम राबविण्याचे जगभरातून प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी करण्यासाठी सर्वच देश आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. याच पाश्र्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या नागरी विकासासाठी कार्यरत असलेल्या युएन हॅबिटॅट आणि युरोपियन कमिशन यांच्या संयुक्त विद्यमाने ब्राझील, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया आणि भारत या चार विकसनशील देशामध्ये हरीत वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी ऊर्जा विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये संपूर्ण भारतामधील सहा राज्यातील १६ शहरांमधून ठाणे शहराची प्रथम क्रमांकाचे शहर म्हणून निवड करण्यात आली असून असा बहुमान मिळविणारी देशातील ही पहिली महापालिका ठरली आहे.
या प्रकल्पातंर्गत महापालिकेच्या वतीने पुढील तीन वर्षांत ऊर्जा संवर्धन आणि अपारंपारिक उर्जेचा वापर करून कमीत कमी हरितगृह वायूचे उत्सर्जन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. दरम्यान, कतार येथील दोहा येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्लायमॅट चेंज या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांना महापालिकेने ऊर्जा संवर्धनासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने आमंत्रित केले आहे. 

Story img Loader