मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेगवेगळ्या आणि आव्हानात्मक विषयांवर चित्रपट तयार होत आहेत. अशाच एका आव्हानात्मक विषयावरील चित्रपटात मुख्य भूमिकेत केतकी माटेगावकर झळकणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘तानी’ असून त्यात केतकी तानीची शीर्षक भूमिका साकारणार आहे. नागपूरमधील सायकल रिक्षाचालकांच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटात केतकी या रिक्षाचालकाच्या मुलीचे काम करीत आहे. अरुण नलावडे या सायकल रिक्षाचालकाची भूमिका करीत आहेत.
‘शाळा’मध्ये शिरोडकरच्या भूमिकेत भुरळ पाडणारी आणि ‘काकस्पर्श’मध्ये ताकदीने बालविधवा साकारणारी केतकी आता चित्रपटसृष्टीत पाय घट्ट रोवत आहे. मूळची पुण्याची केतकी सध्या या चित्रपटासाठी खास वऱ्हाडी बोलीचा अभ्यास करीत आहे. दिग्दर्शक संजीव कोलते यांच्यासह केतकी नागपूरमधील विविध स्तरांतल्या लोकांना भेटून त्यांचे राहणे, बोलणे वगैरेचा जवळून अभ्यास करणार आहे.
व्ही. पतके बॅनरखाली निर्मिती होणाऱ्या या चित्रपटाची कथा गायत्री कोलते यांची असून पटकथा आणि संवाद संजीव कोलते यांनीच लिहिले आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण नव्या वर्षांच्या पहिल्या आठवडय़ात नागपूरमध्ये होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा