राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या त्या ६ हजार ६१६ विद्यार्थ्यांच्या पदव्यांची तपासणी करण्यासाठी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय खडक्कार यांच्या अध्यक्षतेखालील समितीचे पुनर्गठन करण्याचा निर्णय परीक्षा मंडळाच्या (बीओई) आजच्या तातडीच्या बैठकीत घेण्यात आला.
त्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाचे (इंटर्नल असेसमेंट) गुण मान्यताप्राप्त शिक्षकांनी द्यायचे, असा शिरस्ता विद्यापीठात पूर्वीपासून होता. दरम्यानच्या काळात विद्यापीठाने एक परिपत्रक काढून महाविद्यालय व्यवस्थापनाच्या अध्यक्ष आणि सचिवांना अंतर्गत मूल्यांकनाचे गुण पाठवण्याचे अधिकार बहाल केले होते. नियमानुसार एकही मान्यताप्राप्त शिक्षक नसलेल्या ६३ महाविद्यालयांनी त्यांच्या ६,६१६ विद्यार्थ्यांचे पाठवलेले गुण नियमबाह्य़ असल्याने त्यांच्या पदव्या बनावट असल्याची तक्रार राष्ट्रपती आणि राज्यपालांकडे केली होती. त्यामुळे बरेच मोठे वादळ उठले. पदवीप्रदान समारंभाला येण्यास राष्ट्रपतीने नकार दिल्याने समारंभ रद्द करण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढवली होती. विविध प्राधिकरणांच्या बैठका आणि राज्यपाल कार्यालयाशी पत्रव्यवहार करून नागपूर विद्यापीठाने त्या पदव्या बनावट नसल्याचे कळवले होते. ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. परीक्षा दिली. त्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांच्या पदव्या बनावट ठरू शकत नसल्याचे बीओईने गेल्यावेळच्या बैठकीत स्पष्ट केले होते. दरम्यान डॉ. सपकाळ यांना पायउतार व्हावे लागले.
विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी कुलगुरूपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पदवीप्रदान समारंभातील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याच प्रयत्नांमुळे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी २६ ऑगस्टला पदवीप्रदान समारंभाला उपस्थित राहण्यास संमती दर्शवली. त्यानुषंगाने १००व्या पदवीप्रदान समारंभासाठी विद्यापीठ कामाला लागले असताना मिश्रा याने राज्यपाल आणि राष्ट्रपतीला पुन्हा पत्र पाठवून तक्रार केली. त्यामुळे पुन्हा पदवीप्रदान समारंभावर अनिश्चिततेचे सावट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यासंदर्भात अनुपकुमारांनी राज्यपाल कार्यालयाशी संवाद आणि भेटीगाठी सुरू ठेवल्या.
कुलपती कार्यालयातील सचिव विकास रस्तोगी आणि स्वत: अनुपकुमार यांच्या मते, त्या ६,६१६ विद्यार्थ्यांच्या पदव्या बनावट नसल्याचे स्पष्ट झाले असले तरी डॉ. संपूर्ण कागदपत्रांच्या आधारे इत्थंभूत तपासणी होणे आवश्यक आहे. याच प्रकरणी कुलगुरूंनी स्वत:च्या अधिकारान्वये डॉ. खडक्कार यांची समिती स्थापन केली होती.  त्या समितीच्या अहवाल पदव्या बनावट नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तरीही पुनर्तपासणीसाठी डॉ. खडक्कार यांच्या अध्यक्षतेखालील समितीचे पुनर्गठन करण्यात यावे, यावर निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आज डॉ. नासरे, डॉ. के.सी. देशमुख आणि डॉ. प्रमोद येवले या बीओई सदस्यांची समितीवर वर्णी लावण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khadakkar committee re appointment
Show comments