सडक अर्जुनी तालुक्यातील खडकी-बाह्मणी जंगलातून सागवानाची तस्करी होत असली तरी वनविभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. गेल्या महिन्यात मुख्य रस्त्यापासून एक किलोमीटर आतील सागवानाची झाडे कापून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. त्यामुळे वनविभागात एकच खळबळ उडाली असून या परिसरात सागवान तस्कर सक्रीय असल्याचे स्पष्ट होत आहे. खडकी-बाह्मणी जंगलात अनेक प्रकारची मौल्यवान वृक्षे असून येथे अवैध वृक्षतोड व लाकडांची तस्करी होत असल्याची बाब यापूर्वीही उघडकीस आली, मात्र, या गरप्रकारावर आळा घालण्यास व वनांचे संरक्षण करण्याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने या परिसरात लाकूड तस्कर सक्रीय असल्याची नेहमीच चर्चा राहते. यावर अवैध वृक्षतोड व लाकूड तस्करीच्या घटना उघडकीस आल्या असल्या तरी वनविभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे जंगलातील लाकूड चोरींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात मुख्य रस्त्यापासून एक किलोमीटरच्या आत जंगलातील दोन सागवान झाडांची एकाच रात्री कत्तल करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. कापलेल्या झाडांची गोलाई पाच फूट असून उंची साधारणत: ३० फूट आहे. त्यामुळे एकाच रात्री दोन किंवा तीन व्यक्तींद्वारे हे काम होणे शक्य नाही. परिणामी लाकूड तस्करांच्या टोळीचेच हे काम असल्याचे उघड होत आहे. दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे धाबे दणाणले असले तरी अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याची माहिती आहे.
देवरी तालुक्यातील देवरी-आमगाव मार्गावरील बोरगाव-डवकी येथील सुजीत अग्रवाल यांच्या घरामागील वाडीतून सहा सागवानाची झाडे कापून नेल्याची घटना घडली. सुजीत अग्रवाल यांनी आपल्या घराच्या मागच्या वाडीत २० वर्षांपूर्वी सागवानाची लागवड केली होती. या काळात सदर सागवानाची चांगलीच वाढ झाली होती. दरम्यान, घटनेच्या दिवशी काही इसमांनी एकाच रात्री सहा सागवान झाडे कापून त्यांची परस्पर विल्हेवाट लावली. ही बाब दुसऱ्या दिवशी अग्रवाल यांच्या लक्षात आली. सध्या सुगीचे दिवस सुरू असून धान कापणीनंतर मळणीच्या निमित्त शेतकरी शेतात रात्रीचे जागरण करतात. मात्र, कुणालाही सागवान कटाई व चोरीची चाहूल लागली नाही. विशेष म्हणजे, वनविभागासाठी हे आव्हान ठरले असून कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी, तत्पर क्षेत्र सहाय्यक, तसेच बीटगार्ड आदी सर्व यंत्रणा सज्ज असूनही लाकूड चोरटय़ांचा तपास कसा लागत नाही, याबाबत खुद्द अधिकारीसुद्धा संभ्रमात आहेत. एकीकडे शासन पर्यावरणाच्या संरक्षणाकरिता अनेक उपक्रम राबवित आहे तर दुसरीकडे शेतात व सांधवाडीत झाडांची सर्रास कत्तल केली जात आहे. त्यामुळे परिसरात सागवानाची तस्करी करणारी टोळी सक्रीय असल्याची शक्यता बळावली आहे. यापूर्वीही सागवान चोरीच्या अनेक घटना या परिसरात उघडकीस आल्या तर काही चोरीचा अद्यापही तपास लागला नाही. दिवसेंदिवस सागवान तस्करी वाढत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा