नगरमध्ये प्रथमच होणाऱ्या ‘स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती’ स्पर्धेच्या तारखा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने आज जाहीर केल्या. या स्पर्धा शहरातील वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलात १० ते १३ जानेवारी दरम्यान होतील. या स्पर्धासाठीच्या अनुदानात राज्य सरकारने यंदापासून वाढ केली असून स्पर्धेच्या आयोजनासाठी ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. यातील २९ लाख रुपये विजेत्या मल्लांना रोख स्वरुपात वाटले जातील.
मॅटवर होणारी ही कुस्ती स्पर्धा फ्री स्टाईल, ग्रीको रोमन व महिलांच्या विविध गटांत होणार आहे. प्रत्येक संघ २१ मल्लांसह व्यवस्थापक व मार्गदर्शक अशा एकूण २७ जणांचा असेल. फ्री स्टाईल व ग्रीको रोमनच्या विजेत्यासाठी प्रत्येकी ७५ हजार रुपये व महिला विजेत्यासाठी ५० हजार असे सर्वोच्च पारितोषिक आहे.
स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री बबनराव पाचपुते, क्रीडा उपसंचालक आनंद व्यंकेश्वर, प्रभारी जिल्हा क्रीडाधिकारी अजय पवार, जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, शहराध्यक्ष आप्पा खताडे, नामदेवराव लंगोटे आदींनी आज त्यासाठी क्रीडा संकुलाची पाहणी केली. संकुलातील स्टेडिअममध्ये आखाडा तयार करुन स्पर्धा होतील. यावेळी बोलताना पाचपुते यांनी १० ते १३ जानेवारी दरम्यान स्पर्धा होणार असल्याची माहिती दिली.
ऑलिंम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी क्रीडा विभागाने ही स्पर्धा सन २००४ मध्ये सुरु केली. सुरुवातीला राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या या स्पर्धेत रोख बक्षिसे परराज्यातीलच मल्ल पटकावू लागल्याने राज्यस्तरावर स्पर्धा घेण्याचा निर्णय सरकारने घेतला. राज्यस्तरीय स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. गेल्या वर्षीपर्यंत स्पर्धेसाठी केवळ १९ लाख रुपयांची तरतूद होती. परंतु यंदा अनुदानात व रोख बक्षिसात सरकारने भरघोस वाढ केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा