कार्वे औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी जमिनीचा कब्जा घेण्यास खंबाळे ग्रामस्थांनी प्रशासनाला तीव्र विरोध केला असून, सोमवारी गाव बंद ठेवून विटय़ात मोर्चा काढण्यात येणार आहे. जमिनीची मोजणी पोलीस बंदोबस्तात शनिवारी झाली असली तरी प्रशासनाने ग्रामस्थांची फसवणूक करून ती कृती केल्याचा आरोप बचाव समितीने केला आहे. गावच्या सरपंच वैशाली सुर्वे यांच्यासह काही महिलांना पोलिसांकडून मारहाण झाल्याची तक्रारही करण्यात आली आहे.
विटा-तासगाव रस्त्यालगत कार्वे येथे औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात आली आहे. या औद्योगिक वसाहतीचे विस्तारीकरण करण्यासाठी शासनाने खंबाळे गावच्या हद्दीतील काही जमीन अधिग्रहित करण्याचे योजले आहे. त्यासाठी शनिवारी प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन गिरी यांच्यासह औद्योगिक महामंडळाचे अधिकारी पोलीस बंदोबस्तासह कार्वे येथे गेले होते.
टेंभू योजनेचे पाणी लवकरच या भागात येणार असल्याने जमिनी बागायती होण्याची चिन्हे आहेत. तसेच औद्योगिक वसाहतीत अद्याप काही भूखंड रिक्त असल्याने औद्योगिकीकरणासाठी अतिरिक्त जमिनीची गरज सध्या नाही. मात्र शासनाने विस्तारीकरणासाठी नव्याने खंबाळे गावच्या हद्दीतील काही जमीन प्रस्तावित केली असून, त्यामुळे काही शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे शासनाच्या जमीन अधिग्रहणास ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे.
प्रशासनाच्या वतीने शनिवारी जमिनीची मोजणी प्रक्रिया करण्यात आली. या वेळी विरोध करणाऱ्या ५६ ग्रामस्थांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गावच्या प्रथम नागरिक सरपंच  वैशाली सुर्वे, अपर्णा पोपट सुर्वे, सुनीता सुर्वे आदींसह काही महिला मोजणी प्रक्रियेच्या ठिकाणी उपस्थित झाल्या. या महिलांची पोलीस महिला कर्मचाऱ्यांशी वादावादीही झाली.  शासनाच्या मोजणी प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्या महिलांना बळाचा वापर करून दूर करण्यात आले. या वेळी पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोपही करण्यात आला. आंदोलनकर्त्यां सर्वानाच पोलीस व्हॅनमध्ये बसविण्याचा प्रयत्न झाला. पुरुष कार्यकर्त्यांना व्हॅनमधून विटा पोलीस ठाण्याकडे पाठविण्यात आले.
आक्रोश करणाऱ्या महिला प्रशासनाचा धिक्कार करीत पोलिसांना सामोऱ्या येताच त्यांनाही जबरदस्तीने पोलीस व्हॅनमध्ये बसविण्यात आले. या गोंधळातच जमिनीच्या मोजणीचे काम सुरू ठेवण्यात आले.
भूमि अधिग्रहणाबाबत चच्रेसाठी बोलावून प्रशासनाने फसवणूक केली असल्याचा आरोप जमिन बचाव समितीने केला असून, पोलिसीबळाचा वापर करून आम्हाला भूमिहीन करण्याचा प्रयत्न कदापि सहन केला जाणार नाही असा इशारा भूसंपादन विरोधी कृती समितीचे विजय सुर्वे यांनी दिला आहे. यासाठी आज (सोमवारी) गाव पूर्णपणे बंद ठेवून विटा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले.
 

Story img Loader