यवतमाळ जिल्ह्य़ातील २००६ च्या खरडीचे २० टक्के अनुदान लवकरच शेतकऱ्यांना मिळणार असून पुनर्वसनाचा प्रश्नही तात्काळ मार्गी लागावा, यासाठी आपण जातीने मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली असून पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी आर्णी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सभेत बोलताना दिली.
आर्णी तालुका काँग्रेस समितीच्या वतीने आयोजित बुथ लेव्हल एजंट कार्यशाळेच्या कार्यक्रमात त्यांनी मार्गदर्शन केले. घटनेने नागरिकांना दिलेला मतदानाचा अधिकार सर्वोच्च असून लोकशाही बळकट करण्याकरिता प्रत्येकाने मतदान केले पाहिजे, असेही ते पुढे म्हणाले.
रमाई घरकुल योजनेच्या माध्यमातून दलित प्रवर्गातील ८० टक्के उद्दिष्ट साध्य झाले असून आदिवासींच्या घरकुलासाठी शासनाने विशेष निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती त्यांनी या कार्यक्रमातून दिली. प्रास्ताविक तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष साजीदबेग यांनी केले. निवडणूक विभागाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार कुंभलकर यांनी मार्गदर्शन केले.
मोघे यांनी मात्र तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीसंदर्भात शासनाकडून मदत मिळणार की नाही, यासंदर्भात मात्र शब्दही काढला नाही. आर्णीचे नगराध्यक्ष अनिल आडे, उपाध्यक्ष आरीज बेग, जि.प. सदस्य सोनबा मंगाम, पं. स. सभापती राजू विरखडे, उपसभापती सरनाथ खडस आदी मंडळी उपस्थित होती. सूत्रसंचालन प्रमोद कुदळे यांनी, तर आभार तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष नरेश राठोड यांनी मानले

Story img Loader