खारघर वसाहतीच्या सुरक्षेसाठी सिडकोने बांधलेल्या पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचा हस्तांतरण सोहळ्याचा मुहूर्त पुन्हा एकदा विजयादशमीला ठरविण्यात आल्याचे समजते. दरम्यान नवीन निवडूण आलेले लोकप्रतिनिधी सत्तेवर बसल्यास मंत्री महोदयांच्या हस्ते हा पोलीस ठाण्याचा हस्तांतरण सोहळा घेण्यात येईल. अन्यथा नवी मुंबईचे पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांच्या हस्ते हा सोहळा घेण्याचे पोलीस दलाने ठरविल्याचे समजते.
खारघर पोलीस ठाण्याच्या इमारतीचे बांधकाम तीन महिन्यांपूर्वीच तयार झाले आहे. परंतु राज्याच्या मंत्री महोदयांच्या वेळेअभावी हा मुहूर्त वेळोवेळी पुढे ढकलावा लागला. सध्या खारघरचे पोलीस दुमजली रो हाऊसमधून हे पोलीस ठाण्याचे कामकाज चालवीत आहे. येथे पोलीस कोठडीची सोय नाही.
त्यामुळे खारघर पोलिसांनी स्वत: पकडलेले कैदी कळंबोली, कामोठे या पोलीस ठाण्यांच्या कोठडीत ठेवण्याची वेळ या पोलिसांवर आली आहे.
हा सर्व कारभार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. खारघर पोलीस ठाण्याची नवीन बांधलेली इमारत ही पोलिसांच्या हस्तांतरणापूर्वी गळकी ठरल्याने पोलीस आयुक्तांनी ठेकेदार व सिडकोच्या कार्यप्रणालीवर जाहीर नाराजी व्यक्त केल्याने या इमारतीच्या हस्तांतरणा अगोदर ही इमारत चर्चेत आली आहे.  

Story img Loader