कर्मचाऱ्यांनी बोनसवर सोडलेले पाणी, बस भाडेवाढ, वीज ग्राहकांकडून मिळणारा परिवहन अधिभार, पालिकेकडून मिळालेला मदतीचा हात आदी विविध कारणांमुळे बुडत्या बेस्ट उपक्रमाला आधार मिळाला असताना आता नव्या टोलचा भार सोसावा लागणार आहे. कळंबोलीकरांच्या सोयीसाठी वडाळा आणि घाटकोपर येथून सोडण्यात येणाऱ्या बसगाडय़ा आधीच तोटय़ात धावत असताना आता खारघरच्या टोलचा भरुदड बेस्टला सहन करावा लागणार आहे. परिणामी ही सेवा सुरू ठेवायची की नाही असा प्रश्न बेस्टला पडला आहे.
कळंबोलीवासीय आणि दरम्यानच्या रहिवाशांना एक पर्याय म्हणून बेस्ट उपक्रमाने वडाळा आणि घाटकोपर येथून थेट कळंबोलीपर्यंत बस सेवा सुरू केली. दररोज वडाळा ते कळंबोली दरम्यान सी-५२ सेवेच्या १४, तर एएस ५०३ सेवेच्या सात अशा एकूण २१ फेऱ्या होतात. त्याशिवाय घाटकोपर ते कळंबोली दरम्यान सी ५३ सेवेच्या आठ फेऱ्या होतात. कळंबोलीकरांसाठी सोडण्यात येणाऱ्या सर्वच्या सर्व ३० बसगाडय़ा तोटय़ात धावत आहेत.
वाशी टोलनाक्याचा भार सहन करीत बेस्ट उपक्रम या बसगाडय़ांमुळे होणारा तोटा सहन करीत होती. मात्र आता खारघर येथील टोलनाक्यावर टोल वसुली सुरू झाली आहे. दर महिन्याला बसच्या एका फेरीसाठी बेस्टला खारघरच्या टोलपोटी ५,५०१ रुपये मोजावे लागणार आहेत. दर महिन्याला ३० फेऱ्यांसाठी बेस्टला १ लाख ६५ हजार रुपये टोलपोटी भरावे लागणार आहेत. संपूर्ण वर्षांत केवळ ३० फेऱ्यांसाठी सुमारे १९ लाख ८० हजार रुपये टोलपोटी खर्च होणार आहे. या बसगाडय़ा आधीच तोटय़ात असताना आता आणखी १९ लाख ८० हजार रुपयांचा भरुदड बेस्टला सहन करावा लागणार आहे.
महापालिकेमध्ये शिवसेना-भाजपची सत्ता आहे. तर राज्यामध्येही भाजप-शिवसेना सत्तेवर आहे. असे असतानाही पालिकेचाच उपक्रम असलेल्या बुडत्या बेस्टला सावरण्यासाठी पुरेसे प्रयत्न होत नसल्यामुळे प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करू लागले आहेत. विविध करांच्या रूपात पालिकेच्या तिजोरीत जमा होणाऱ्या महसुलातून बेस्टच्या डळमळलेला आर्थिक डोलारा सावरण्याऐवजी मुंबईकरांच्याच खिशात हात घालण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. मुंबईच्या कानाकोपऱ्यात धावणारी बस वाचविण्यासाठी बेस्टच्या केवळ शहरातील १० लाख वीज ग्राहकांवर परिवहन अधिभार लादण्यात आला आहे. आता मालमत्ता करामध्येही सुधारणा करून बेस्टसाठी नागरिकांकडूनच पैसे उकळण्याचा घाट घालण्यात येत आहे. मात्र राज्य सरकार केवळ बेस्टकडे बघ्याचीच भूमिका घेत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा