बाराव्या ‘स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धे’स आज सायंकाळी शानदार उद्घाटनाने वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलात प्रारंभ झाला. महाराष्ट्राचे वैभव असलेल्या कुस्ती खेळास सरकार कायम प्रोत्साहनच देईल, सरकारने राज्याचे क्रीडा धोरण जाहीर केले आता लवकरच युवक कल्याण धोरण जाहीर केले जाईल, असे राज्याचे सहकार व सांस्कृतिक कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उद्घाटनप्रसंगी बोलताना सांगितले.
क्रीडा व युवा सेवा संचलनालय, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद व जिल्हा तालीम संघाने या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. यापूर्वी राष्ट्रीय स्तरावर भरवली जाणारी ही स्पर्धा यंदापासून राज्य स्तरावर भरवली जात आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे होते. पालकमंत्री बबनराव पाचपुते यावेळी उपस्थित होते.
दुष्काळ असला तरी सरकार खेळाला महत्व देणार आहे, असे स्पष्ट करुन हर्षवर्धन पाटील यांनी आतापर्यंत ९७१ खेळाडूंना नोकऱ्या देण्यात आल्या, भरतीत खेळाडूंना ५ टक्के आरक्षण देण्यात आले, थेट नियक्तयांसाठी नियमात बदल करण्यात आले, त्याच्या परिणामातून यंदा राष्ट्रीय शालेय स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वाधिक पदके पटकावली, असा दावा केला. कृषिमंत्री विखे यांनी यावेळी स्पर्धा व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
यापुढे खेळ व खेळाडूंना चांगले भवितव्य राहील, असे पालकमंत्री तथा संयोजन समितीचे अध्यक्ष पाचपुते यांनी सांगितले. युवा नेते विक्रमसिंह पाचपुते व तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लोखंडे यांनी स्वागत केले. सन २०१६मधील ब्राझील ऑलिंपिंकसाठी कुस्तीगीर परिषदेने यंदापासून मिशन सुरु केले आहे, त्यासाठी राज्य सरकारने २ कोटी रुपयांचा निधी दिला आहे, परिषदेने २१ ठिकाणी मॅटवरील प्रशिक्षण केंद्रे सुरु केल्याची माहिती परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी दिली.
स्व. खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. खेळाडूंनी पोलीस बँड पथकाच्या तालावर मानवंदना दिली. नगरचा मल्ल गोरख खंडागळे याने आणलेली क्रीडाज्योत मंत्री पाटील यांनी प्रज्वलीत केली. यावेळी अर्जुन पुरस्कार विजेता काका पवार, महाराष्ट्र केसरी अशोक शिर्के, शिवाजी सातपुते, बापू लोखंडे, जि.प. अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, खासदार दिलीप गांधी, महापौर शिला शिंदे, आ. चंद्रशेखर घुले, क्रीडा उपसंचालक आनंद व्यंकेश्वर आदी उपस्थित होते.

स्व. छबूराव लांडगेंचा विसर
नगरचे नाव कुस्ती क्षेत्रात देशभर गाजवणारे स्व. छबूराव लांडगे यांचे नाव स्पर्धा ठिकाणास देण्याचा ठराव संयोजन समितीच्या सभेत पालकमंत्री पाचपुते यांच्या उपस्थितीत झाला होता. मात्र आज संयोजन समितीचे त्याकडे दुर्लक्ष झाले होते, सायंकाळपर्यंत तसा फलक कोठे दिसला नाही, जिल्हा तालीम संघाचे काही पदाधिकारी याकडे लक्ष वेधत होते.

*  उद्घाटन समारंभाकडे नगरकरांनी पाठ फिरवली, शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती तुरळक होती.
* विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे, क्रीडामंत्री पद्माकर वळवी, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री जयदत्त क्षीरसागर, क्रीडा राज्यमंत्री भास्कर जाधव येणार म्हणून जाहीर करण्यात आले होते, त्यांची नावेही निमंत्रण पत्रिकेत होती, परंतु या सर्वानी पाठ फिरवली.
*  लढती व्यवस्थित दिसण्यासाठी मोठय़ा स्क्रिनची व्यवस्था करण्यात आली आहे.
*  संजय दुधाणे लिखित स्व खाशाबा जाधव यांच्या चरित्र पुस्तकाचे प्रकाशन मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते झाले.

Story img Loader