बाराव्या ‘स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धे’स आज सायंकाळी शानदार उद्घाटनाने वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलात प्रारंभ झाला. महाराष्ट्राचे वैभव असलेल्या कुस्ती खेळास सरकार कायम प्रोत्साहनच देईल, सरकारने राज्याचे क्रीडा धोरण जाहीर केले आता लवकरच युवक कल्याण धोरण जाहीर केले जाईल, असे राज्याचे सहकार व सांस्कृतिक कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उद्घाटनप्रसंगी बोलताना सांगितले.
क्रीडा व युवा सेवा संचलनालय, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद व जिल्हा तालीम संघाने या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. यापूर्वी राष्ट्रीय स्तरावर भरवली जाणारी ही स्पर्धा यंदापासून राज्य स्तरावर भरवली जात आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे होते. पालकमंत्री बबनराव पाचपुते यावेळी उपस्थित होते.
दुष्काळ असला तरी सरकार खेळाला महत्व देणार आहे, असे स्पष्ट करुन हर्षवर्धन पाटील यांनी आतापर्यंत ९७१ खेळाडूंना नोकऱ्या देण्यात आल्या, भरतीत खेळाडूंना ५ टक्के आरक्षण देण्यात आले, थेट नियक्तयांसाठी नियमात बदल करण्यात आले, त्याच्या परिणामातून यंदा राष्ट्रीय शालेय स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वाधिक पदके पटकावली, असा दावा केला. कृषिमंत्री विखे यांनी यावेळी स्पर्धा व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
यापुढे खेळ व खेळाडूंना चांगले भवितव्य राहील, असे पालकमंत्री तथा संयोजन समितीचे अध्यक्ष पाचपुते यांनी सांगितले. युवा नेते विक्रमसिंह पाचपुते व तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लोखंडे यांनी स्वागत केले. सन २०१६मधील ब्राझील ऑलिंपिंकसाठी कुस्तीगीर परिषदेने यंदापासून मिशन सुरु केले आहे, त्यासाठी राज्य सरकारने २ कोटी रुपयांचा निधी दिला आहे, परिषदेने २१ ठिकाणी मॅटवरील प्रशिक्षण केंद्रे सुरु केल्याची माहिती परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी दिली.
स्व. खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. खेळाडूंनी पोलीस बँड पथकाच्या तालावर मानवंदना दिली. नगरचा मल्ल गोरख खंडागळे याने आणलेली क्रीडाज्योत मंत्री पाटील यांनी प्रज्वलीत केली. यावेळी अर्जुन पुरस्कार विजेता काका पवार, महाराष्ट्र केसरी अशोक शिर्के, शिवाजी सातपुते, बापू लोखंडे, जि.प. अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, खासदार दिलीप गांधी, महापौर शिला शिंदे, आ. चंद्रशेखर घुले, क्रीडा उपसंचालक आनंद व्यंकेश्वर आदी उपस्थित होते.
खाशाबा जाधव राज्य कुस्ती स्पर्धेला शानदार प्रारंभ
बाराव्या ‘स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धे’स आज सायंकाळी शानदार उद्घाटनाने वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलात प्रारंभ झाला. महाराष्ट्राचे वैभव असलेल्या कुस्ती खेळास सरकार कायम प्रोत्साहनच देईल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-01-2013 at 04:05 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khashaba jadhav state wrestling compitition started