जिल्ह्य़ातील प्रत्येक तालुक्यास कबड्डी व खो-खोसाठी खेळासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत मॅट उपलब्ध करुन दिली जाणार आहे, तसेच नगर शहरातही कुस्तीच्या मैदानासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न राहील, असे पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी आज सांगितले.
राज्य सरकारची ‘स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरिय कुस्ती स्पर्धा’ नगरच्या वाडिया पार्क मैदानावर ११ ते १३ जानेवारी दरम्यान होत आहे, त्याच्या पूर्वतयारीसाठी आयोजन समितीची बैठक पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. ही स्पर्धा यशस्वी करण्याचे, तसेच स्पर्धेच्या निमित्ताने नगरचा नावलौकिक वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले.
स्पर्धेच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे, क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. दि. १२ रोजी गृहमंत्री आर. आर. पाटील, पाणी पुरवठामंत्री लक्ष्मण ढोबळे, शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान व समारोपप्रसंगी दि. १३ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार, अर्थमंत्री जयंत पाटील, उच्च शिक्षण मंत्री राजेश टोपे व जयदत्त क्षीरसागर उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेसाठी किमान १०-१२ मंत्री उपस्थित राहतील. स्पर्धेचे आकर्षण निर्माण होण्यासाठी चित्रपट अभिनेते सलमान खान, शाहरुख खान, तुषार कपूर, अशोक सराफ यांनाही निमंत्रित केले जाणार आहे.
स्पर्धेसाठी सरकारने ५० लाख रुपयांची तरतुद केली आहे, त्यातील ३० लाख रुपये मल्लांना रोख स्वरुपाची बक्षीसे दिले जातील, परंतु स्पर्धेसाठी सुमारे १ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून बँका, पतसंस्था, साखर कारखाने, देणगीदार यांच्याकडून सहकार्य अपेक्षित असल्याचे पाचपुते यांनी सांगितले. स्पर्धेच्या ठिकाणी मोठे स्क्रिन लावले जाणार आहेत, सर्व खेळाडूंना ट्रॅकसूट दिले जाणार आहेत, त्यांच्या जेवणासाठी शाकाहरी व मांसाहरी व्यवस्था केली जाणार आहे, पंचांना ट्रॅकसूटसह जाकिट व टोप्या दिल्या जाणार आहेत. बंदोबस्तासाठी राज्य राखीव दलाचे जवानही तैनात केले जाणार आहेत. स्पर्धेसाठी हिंद केसरी व महाराष्ट्र केसरी विजेत्यांना निमंत्रित केले जाईल व जिल्ह्य़ातील पुरस्कारप्राप्त खेळाडूंचा गौरव केला जाणार आहे.
सर्वश्री विक्रमसिंह पाचपुते, दादा कळमकर, विनायक देशमुख, शंकरराव घुले, सचिन जगताप, दिपक सुळ, संजय झिंजे, डी. एम. कांबळे, राजेंद्र चोपडा, वसंत लोढा, रविंद्र कवडे, दिप चव्हाण, शेख गफार, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय बारकुंड आदींनी विविध सूचना केल्या. जि. प. सभापती बाबासाहेब तांबे, क्रीडा उपसंचालक आनंद व्यंकेश्वर, जिल्हा क्रीडाधिकारी अनिल चोरमले आदी उपस्थित होते. क्रीडा मार्गदर्शक अजय पवार यांनी प्रास्ताविक केले.    
संकुलाचा वाद, इतरांमध्येही वाद!
सभेत वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलाच्या वादाचा विषयही उपस्थित करण्यात आला. ‘हा केवळ इगोचा प्रश्न आहे, कोणी पुढाकार घ्यायचा व कोणी माघार घ्यायची यावर अडला आहे, त्यासाठी पुढील आठवडय़ात आमदार, महापौर व आपल्या उपस्थितीत बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न होईल’, असे पालकमंत्री पाचपुते म्हणाले. सभेत डी. एम. कांबळे व उबेद शेख यांच्यात वैयक्तिक वादातून खडाजंगी झाली. सचिन जगताप व संजय झिजे यांच्यातही वादावादी झाली.
जलतरण तलावाचेही उद्घाटन
कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनास येणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच वाडिया पार्कमधील जलतरण तलावाचेही उद्घाटन केले जाणार आहे. जलतरण तलावास महापौरांनी मनपाच्या वतीने मोफत पाणी देण्याचे मान्य केल्याचे पालकमंत्री पाचपुते यांनी जाहीर केले.
स्पर्धेला अनेकांची मदत
कुस्ती स्पर्धेसाठी अनेकांनी सहकार्य करण्याचे मान्य केले. हिंद सेवा मंडळाच्या वतीने ३०० खेळाडू स्वयंसेवक म्हणून उपलब्ध केले जातील, असे वसंत लोढा यांनी सांगितले. उद्योजक माधवराव लामखेडे यांनी ५१ हजार रु., राजेंद्र चोपडा यांनी २१ हजार रु., जि.प. सभापती तांबे यांनी ११ हजार रु. देणगी जाहीर केली. स्पर्धेतील विजेत्यास रोख बक्षिसासह ५ किलो चांदीची गदा दिली जाणार आहे.