विदर्भ अजिंक्यपद खो-खो स्पर्धा
नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळातर्फे आयोजित ४८व्या विदर्भ अजिंक्यपद खो-खो स्पध्रेत पुरुष गटात अमरावतीने तर महिला गटात यवतमाळने विजेतेपद पटकावले. दोन्ही गटांमध्ये नागपूर जिल्हा संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
चिटणीस पार्क स्टेडियमवर रविवारी झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात मध्यंतरापर्यंत अमरावतीकडे ९-८ अशी आघाडी होती. मध्यंतरानंतर नागपूरचे १३ गडी टिपून अमरावतीच्या खेळाडूंनी सामन्यावर पकड मिळवली. विजेत्या संघाच्या संदीप विधळे व आशिष कावरे यांनी तर पराभूत संघातर्फेअजय पंचभाई व कुणाल वाईकरने आकर्षक खेळ केला.
महिलांच्या अंतिम सामन्यात यवतमाळने गतविजेत्या नागपूरवर दोन गडय़ांनी मात केली. कर्णधार सायली लामकासे व स्वीटी झेंडेकरच्या दमदार खेळाच्या जोरावर यवतमाळ संघाने अजिंक्यपद मिळवले. नागपूर संघाच्या खुशाली उमाठे व दीपाली सबाने यांनी लक्षणीय खेळ सादर केला.
सबज्युनियर मुलांच्या जिल्हास्तरीय स्पध्रेत युवक क्रीडा मंडळाने काटोलच्या विदर्भ युथ मंडळावर १३-१२ ने मात करून अजिंक्यपद मिळवले. मुलींमध्ये विदर्भ युथ मंडळाने पाचखेडी येथील जयहिंद क्रीडा मंडळावर दोन गुणांनी मात केली.
आमदार अनिल सोले व विकास कुंभारे यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. विजेत्या व उपविजेत्या संघांना रोख पाच हजार व अडीच हजार रुपयांचा पुरस्कार व करंडक देण्यात आला. उत्तम खेळ सादर करणाऱ्या खेळाडूंना वैयक्तिक पुरस्कारसुद्धा देण्यात आले. या स्पध्रेतील कामगिरीच्या आधारावर बंगळुरू येथे १७ ते २१ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय खो-खो स्पध्रेसाठी पुरुष व महिला संघांची घोषणा करण्यात येईल, असे विदर्भ खो-खो संघटनेचे सचिव रामदास दरणे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाला दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते भाऊ काणे, सुधीर निंबाळकर, अशोक मोरे उपस्थित होते. विशाखा जोशी व नरेश शेळके यांनी संचालन केले तर प्रशांत जगताप यांनी आभार मानले.
अमरावतीचे पुरुष, तर यवतमाळच्या महिला अव्वल
नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळातर्फे आयोजित ४८व्या विदर्भ अजिंक्यपद खो-खो स्पध्रेत पुरुष गटात अमरावतीने तर महिला गटात यवतमाळने विजेतेपद पटकावले. दोन्ही गटांमध्ये नागपूर जिल्हा संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले
First published on: 19-11-2014 at 07:40 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kho kho competition final result