विदर्भ अजिंक्यपद खो-खो स्पर्धा
नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळातर्फे आयोजित ४८व्या विदर्भ अजिंक्यपद खो-खो स्पध्रेत पुरुष गटात अमरावतीने तर महिला गटात यवतमाळने विजेतेपद पटकावले. दोन्ही गटांमध्ये नागपूर जिल्हा संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
चिटणीस पार्क स्टेडियमवर रविवारी झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात मध्यंतरापर्यंत अमरावतीकडे ९-८ अशी आघाडी होती. मध्यंतरानंतर नागपूरचे १३ गडी टिपून अमरावतीच्या खेळाडूंनी सामन्यावर पकड मिळवली. विजेत्या संघाच्या संदीप विधळे व आशिष कावरे यांनी तर पराभूत संघातर्फेअजय पंचभाई व कुणाल वाईकरने आकर्षक खेळ केला.
महिलांच्या अंतिम सामन्यात यवतमाळने गतविजेत्या नागपूरवर दोन गडय़ांनी मात केली. कर्णधार सायली लामकासे व स्वीटी झेंडेकरच्या दमदार खेळाच्या जोरावर यवतमाळ संघाने अजिंक्यपद मिळवले. नागपूर संघाच्या खुशाली उमाठे व दीपाली सबाने यांनी लक्षणीय खेळ सादर केला.
सबज्युनियर मुलांच्या जिल्हास्तरीय स्पध्रेत युवक क्रीडा मंडळाने काटोलच्या विदर्भ युथ मंडळावर १३-१२ ने मात करून अजिंक्यपद मिळवले. मुलींमध्ये विदर्भ युथ मंडळाने पाचखेडी येथील जयहिंद क्रीडा मंडळावर दोन गुणांनी मात केली.
आमदार अनिल सोले व विकास कुंभारे यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. विजेत्या व उपविजेत्या संघांना रोख पाच हजार व अडीच हजार रुपयांचा पुरस्कार व करंडक देण्यात आला. उत्तम खेळ सादर करणाऱ्या खेळाडूंना वैयक्तिक पुरस्कारसुद्धा देण्यात आले. या स्पध्रेतील कामगिरीच्या आधारावर बंगळुरू येथे १७ ते २१ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय खो-खो स्पध्रेसाठी पुरुष व महिला संघांची घोषणा करण्यात येईल, असे विदर्भ खो-खो संघटनेचे सचिव रामदास दरणे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाला दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते भाऊ काणे, सुधीर निंबाळकर, अशोक मोरे उपस्थित होते. विशाखा जोशी व नरेश शेळके यांनी संचालन केले तर प्रशांत जगताप यांनी आभार मानले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kho kho competition final result