कोणताही पुरस्कर्ता पाठीशी नसताना मातीच्या खेळाला उंचभरारी देण्याचे स्वप्न पनवेल तालुका खो-खो असोशिएशनने प्रत्यक्षात उतरविले आहे. असोशिएशने भरविलेल्या थरार खो-खो प्रीमीयर लिगच्या दुसऱ्या वर्षांतील सामने डिसेंबर महिन्यात २४ ते ३१ दरम्यान कर्नाळा स्पोर्टस अ‍ॅकेडमी येथे खेळविले जाणार आहेत. याच सामन्यांच्या स्पर्धकांची सामनापुर्व चाचणी घेण्यासाठी असोशिएशनने संपुर्ण तालुकाभ्रमण मोहीम हाती घेतली आहे. गेल्यावर्षांच्या तुलनेत दुप्पट सहभाग खेडय़ापाडय़ातील मुलांनी नोंदविला आहे.
लाल मातीची चिकाटी असलेला कब्बडी खेळाला जसे चंदेरीरुप भेटले तशाच चांदणीचा लखलखाट खो खो खेळाला मिळावा या एका ध्येयापोटी पनवेलच्या खो खो असोशिएशने ही स्पर्धा सुरु केली आहे. या असोशिएशनचे अध्यक्ष वहाळचे रवी पाटील व सचिव विजय जाधव हे आहेत. १४ ते २० वयोगटातील विद्यार्थ्यांचा या खेळामध्ये उस्फुर्त सहभाग लाभत आहे. तालुक्यातील जिल्हापरिषद आणि खासगी विद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी स्वच्छेने या स्पर्धेमध्ये सहभाग होण्यासाठी आपली उत्सुकता दर्शविल्याचे असोशिएशनचे कार्यवाहक विनायक खरे यांनी सांगितले. गेल्या वर्षी १७२ विद्यार्थ्यांपैकी ९० विद्यार्थ्यांचे ६ संघांचे येथे सामने झाले. यामध्ये वहाळ योद्धा या संघाने बाजी मारली. दुसऱ्या क्रमांकावर दोधाणी चॅलेंजर्स संघाला समाधान मानावे लागले. अपुऱ्या प्रसिद्धीमुळे माजी आमदार विवेक पाटील यांचे योगदान वगळता कोर्पोरेट क्षेत्रातील कोणत्याही बडय़ा कंपन्यांचा हात स्पर्धकांच्या पाठीवर फिरलेला नाही. खो खो खेळ टिकण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी त्याचे लिगमध्ये रुपांतर होऊन खेळाडुंना चांगले दिवस येण्यासाठी सध्या तालुक्यातील कर्नाळा स्पोर्टस अ‍ॅकेडमी, त्यानंतर कळंबोली येथील द. ग. तटकरे विद्यालयात स्पर्धकांची प्राथमिक गुणवत्ता निवड चाचणी सुरु झाली आहे. या स्पर्धेमध्ये निवड होण्यासाठी असोशिएशनने ७ डिसेंबरला रसायनी चावणे येथील माध्यमिक विद्यालयात निवड चाचणी प्रक्रीया होणार आहे. यावेळी एकुण ८ संघ एकमेकांसमोर आव्हान ठेवणार आहेत. त्यापैकी दोन संघ हे १४ वर्षेवयोगटातील मुलांचा आहे. या दोन्ही संघांना वाईल्ड कार्ड प्रवेश ठेवला आहे. खो खो च्या थरारामध्ये वहाळ योद्धा, दोधाणी चॅलेंजर्स, कळंबोली फायटर, कासप हिरोज, पनवेल रायडर आणि चावणे वॉरीयर अशा संघ पहिल्या क्रमांकावर आपले नाव कोरण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Story img Loader