अपहरण झालेल्या एका तेरा वर्षांच्या मुलाची मध्य प्रदेशातील एका गावातून सुटका करीत तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.
नंदू (भय्या) गुप्ता (रा. नागेश्वरनगर पारडी), हरीनारायण माळी (रा. सुसनेर जि. शाहापूर म.प्र.) व सुसनेरचा सरपंच हे आरोपी आहेत. इम्तियाज उर्फ मुन्ना मोहम्मद हुसेन अन्सारी (रा. भांडेवाडी) याला आरोपी नंदू (भय्या) गुप्ता (रा. नागेश्वरनगर पारडी) याने १९ जानेवारीला सकाळी अकरा वाजताच्या सुमारास ‘गाडी फसली आहे’ असे सांगून बोलावून घेतले. त्याला मोटारसायकलने मध्य प्रदेशातील शहापूर जिल्ह्य़ात असलेल्या सुसनेर गावात नेले. तेथे त्याची मानलेली बहीण रहाते. त्याच गावात राहणाऱ्या आरोपी हरीनारायण माळी व सरपंचाच्या ताब्यात दिले. ‘याचे वडील श्रीमंत असून त्यांच्याकडून हवी तेवढी रक्कम माग’ अशी थाप मारून नंदू मानलेल्या बहिणीसह पळून गेला. सरपंच व हरीनारायण या दोघांनी मुन्नाला डांबून ठेवले.  मुन्ना बेपत्ता झाल्याने त्याच्या वडिलांनी कळमना पोलीस ठाण्यात नोंद केली होती. त्यानंतर मुन्नाच्या वडिलांना हरीनारायण व सरपंचाने फोन करून ५० हजार रुपयांची मागणी केली. रक्कम न दिल्यास मुलास सोडणार नाही, अशी धमकी त्या दोघांनी दिली. मुन्नाच्या वडिलांनी कळमना पोलीस गाठले. पोलिसांनी त्याच्यासह सूसनेर गाव गाठले. तेथे महत्प्रयासाने त्यांनी मुन्नाची सुटका केली. आरोपी नंदू मानलेल्या बहिणीसह पळून गेल्याचे हरीनारायण व सरपंचाने पोलिसांना सांगितले असले तरी ती त्याची बहीण नसून तिला आरोपी नंदूने पळून नेले आणि ५० हजार रुपयात तिला विकले. मात्र, तिने त्या दोघांसह राहण्यास नकार देत पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची धमकी दिल्याने हरीनारायण व सरपंचाने नंदूला रक्कम परत मागितली व न दिल्यास मारण्याची धमकी दिली असल्याचेही पोलिसांना समजले.  

Story img Loader