बागल चौकातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सोने लुटण्याच्या प्रकरणात शाहूपुरी पोलीसांचा  तपास दोन दिवसानंतरही थंडच आहे. त्यामुळे हा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवावा आणि  गुन्हेगारांना शोधण्यात कसूर करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी भाजपाच्या महिला आघाडी अध्यक्षा नीता केळकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत केली. सायंकाळी पोलीस अधीक्षक डॉ.विजयसिंह जाधव यांची केळकर यांच्यासह भाजपाच्या शिष्टमंडळाने भेट घेवून मागणीचे निवेदन सादर केले.
    बागल चौक येथील एका सदनिकेमध्ये घुसून भरदिवसा अल्पवयीन मुलीचे अपहरण व घरातील सव्वा  लाख रूपये किंमतीचे दागिने लंपास करण्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपीवर तडीपारीचा प्रस्ताव दाखल आहे. चित्रपटात शोभावा असा पंधरा-वीस गुंडांचा हा प्रकार अतिशय  गंभीर आहे. मुलीच्या वडीलांनी या गुंडांना प्रतिकार केला होता. या घटनेची माहिती शाहूपुरी पोलीसांना मिळाली असतांनाही त्यांनी तातडीने हालचाली केल्या नाहीत. वेळीच नाकेबंदी केली असती तर गुन्हेगार हाती लागले असते, असे केळकर म्हणाल्या.
    गुन्हा दाखल झालेल्या शाहूपुरी पोलीसांची तपास पध्दत विश्वासार्ह नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास त्यांच्याकडून काढून घेवून तो स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात यावा. तपास अधिकाऱ्याच्या  कामकाजपध्दतीविषयी शंका निर्माण झाल्याने त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी केळकर केली.
    पत्रकार परिषदेस अपहरण झालेल्या मुलीचे वडील उपस्थित होते. त्यांनी प्रेम प्रकरणातून मुलीचे अपहरण झाले असल्याच्या मुद्याचा स्पष्टपणे इन्कार केला. ते म्हणाले, तिचे प्रेम प्रकरण असते तर ती घरातून कधीही निघून गेली असती. ती स्वतच्या इच्छेने अजिबात गेलेली नाही. जातांना तिने अपहरण करणाऱ्या गुंडांना विरोध केला होता. मुलीचे प्रेमप्रकरण होते असा मुद्दा उपस्थित करून पोलीस मुळ तपासाला बगल देण्याचा प्रयत्न करीत आहेत. याप्रकरणी आमदार महादेवराव महाडिक व उद्योजक धनंजय महाडिक यांनी आपल्याला धीर दिला.
 वर्षा देशपांडेंवर टिकास्त्र
    उपराकार लक्ष्मण माने यांनी त्यांच्या संस्थेत नोकरी करणाऱ्या महिलांवर लैंगिक अत्याचार केले असतांना सामाजिक कार्यकर्त्यां अ‍ॅड.वर्षां देशपांडे यांनी माने यांची बाजू घेतल्याबद्दल नीता केळकर यांनी  टिकास्त्र सोडले. त्या म्हणाल्या, गर्भजल परिक्षा करणाऱ्या सोनोग्राफी केंद्रांवर धाड घालणाऱ्या वर्षां देशपांडे यांनी माने यांच्या बाबतीत घडलेल्या प्रकाराबाबत घेतलेली भूमिका अयोग्य आहे. माने यांच्या विरोधात तक्रार नोंदविण्यासाठी आलेल्या पिडित महिलांना तक्रार करू नका, त्यामध्ये दम नाही असे सांगत देशपांडे यांनी संबंधित महिलांना तक्रारीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. ही भूमिका त्यांच्याकडून अजिबात अपेक्षित नव्हती. सुदैवाने माने यांना अटक झाली असून कारवाई सुरू आहे. देशपांडे यांनी गर्भजल चिकित्सा होणाऱ्या ठिकाणी धाडी घातल्या. याची फेरतपासणी झाली पाहिजे का या प्रश्नावर बोलतांना केळकर म्हणाल्या, अशा प्रकरणांबाबत ज्या डॉक्टरांना त्रास झाला आहे. त्यांना समर्थन दिले जाईल.

Story img Loader