घरोघरी विविध सण, उत्सव साजरे होत असताना देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांना मात्र, कुठलाही सण नाही की उत्सव नाही, देशाची सुरक्षा करणे हेच एकमेव ध्येय त्यांच्यासमोर असल्यामुळे रक्षाबंधन असो, भाऊबीज असो की रमजान ईद, अशा उत्सवाची ते आतुरतेने वाट पाहात असतात.. रक्षाबंधनानिमित्त देशभरातील विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्था सीमेवरील सैनिकांना राखी पाठवून ‘सैनिको हो तुमच्यासाठी..’ अशी भावना व्यक्त करीत आम्ही तुमच्या सोबत आहोत, हे दाखवून देत असतात.
सी पी अॅण्ड बेरार महाविद्यालय आणि प्रहार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी रेशीम धाग्याच्या अतिशय आकर्षक, सुबक अशा १५ हजारांहून अधिक राख्या तयार करून एका समारंभात आज कामठीतील आर्मी पोस्टल सव्र्हिस सेंटर अॅण्ड रेकॉर्डचे कमांडंट कर्नल शाजी जोसेफ यांच्याकडे सुपूर्द केल्या. महाविद्यालयाच्या गृहशास्त्र विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब महाजन, प्रहार संस्थेचे प्रमुख कर्नल सुनील देशपांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद बारहाते, उप प्राचार्य डॉ. दत्तात्रय बाराहाते, गृहअर्थशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख  प्रेरणा रत्नपारखी उपस्थित होत्या.
या वेळी कर्नल शाजी जोसेफ म्हणाले, रक्षाबंधन असो की दिवाळी, अशा उत्सवांना सीमेवर देशाचे रक्षण करीत असलेले सैनिक घरी परत येऊ शकत नाहीत. त्यामुळे देशवासीयांकडून त्यांना राख्या किंवा आपल्याकडील अनेक गोष्टी मिळाल्या की खूप आनंद होत असतो. आज संगणकीकरणामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या असल्या तरी या राख्यांचे महत्त्व मात्र कमी झाले नाही. पोस्ट सव्र्हिसच्या माध्यमातून सीमेवरील सैनिकांपर्यंत या राख्या पोहोचविल्या जाणार असल्याचे जोसेफ यांनी सांगितले.
कर्नल (निवृत्त) सुनील देशपांडे म्हणाले, सीमेवर लढणाऱ्या सैनिकांची आठवण ही केवळ युद्धाच्या वेळी होत असते मात्र, त्यानंतर त्यांचा विसर पडतो. पाकिस्तानाचे सैनिक भारतीय सैनिकांवर हल्ले करीत असले तरी भारतीय सैनिक त्याला सडेतोड उत्तर देत आहेत. प्रहारमध्ये सैनिकी शिक्षण घेतलेले अनेक युवक आज देशाच्या सीमेवर देशाचे रक्षण करीत आहेत. ते सीमेवर कुठल्या परिस्थितीमध्ये जीवन जगत असतात याची अनेकांना कल्पना नाही.
सैनिकांना फक्त प्रेम हवे आणि ते मिळाले की त्यांचे आत्मबल वाढत असते. राखी म्हणजे केवळ रेशमी धागा नाही तर त्या धाग्यापासून त्यांना एक वेगळी शक्ती मिळत असते असेही कर्नल देशपांडे म्हणाले. प्राचार्य मिलिंद बारहाते यांनी प्रास्ताविक केले. प्रहारच्या चिमुरडय़ांनी या वेळी कर्नल नाईक यांना राखी बांधून सीमेवरील सैनिकांसाठी राखी भेट दिल्या. कार्यक्रमाचे संचालन रीता सोनटक्के यांनी केले. प्रा. प्रेरणा रत्नपारखी यांनी आभार मानले. भाग्यश्री झाडगावकर यांनी गायलेल्या वंदे मातरम्ने कार्यक्रमाची सांगता झाली.

Story img Loader