सेवा समाप्तीचा लाभ मिळावा या मागणीसाठी सोमवारी हजारो अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी सांगलीच्या जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून काँग्रेस व राष्ट्रवादी कार्यालयाच्या दारात  ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जो पर्यंत वरिष्ठ अधिकारी अथवा मंत्री येऊन मागण्यांबाबत ठोस भूमिका स्पष्ट करीत नाहीत, तो पर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याचे संघटनेच्या कार्याध्यक्ष मंगला सराफ यांनी सांगितले.  इस्लामपूरपासून पदयात्रेने आलेल्या मोच्रेकरी महिलांनी जिल्हा परिषदेचे आवार घोषणांनी दणाणून सोडले.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवासमाप्तीनंतर देण्याच्या एकरकमी लाभाचा प्रश्न २००४ सालापासून रेंगाळत पडला आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने सोमवारी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व कार्याध्यक्षा मंगला सराफ, जिल्हाध्यक्षा स्नेहलता कोरे, उपाध्यक्षा आनंदी भोसले, सचिव नादिरा नदाफ आदींसह कमल साळुंखे, अरुणा झगडे, रेखा साळुंखे, अफरोज नदाफ, माधुरी जोशी, मधुमती मोरे, मथुरा कांबळे, अलका माने, अलका विभुते, नीलप्रभा लोंढे आदींनी केले. मोर्चामध्ये हजारो महिला कर्मचारी गणवेशात सहभागी झाल्या होत्या.
अंगणवाडी सेविकांना निवृत्तिवेतन देण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. भाऊबीज भेट म्हणून मिळणारी १ हजार रुपयांची रक्कम तोकडी असून मासिक मानधनाएवढी रक्कम मिळावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलक महिला कर्मचाऱ्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पक्ष कार्यालयावर ठिय्या आंदोलनही सुरू केले आहे.

Story img Loader