किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादकांना २६२१ रुपये भाव जाहीर केला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी दिली. किसन वीर कारखान्यावर झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत यावर्षी कारखान्याकडे गाळपासाठी येणाऱ्या उसाला २६२१ रुपये पहिली उचल जाहीर करताना मदन भोसले यांनी मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या मनातील अनिश्चितता संपवली असल्याचे म्हटले आहे. वाढत्या ऊसदराबरोबर ऊस तोडणी मजूर व वाहतूकदार यांच्याही अपेक्षा वाढलेल्या आहेत. किसन वीर कारखान्याने अनेक सहयोगी प्रकल्पात कोटय़वधी रुपयांची गुंतवणूक केली असून यातील काही प्रकल्प आता सुरू झाले आहेत, त्यामुळे या प्रकल्पांचे कर्ज कमी होताच त्या प्रकल्पांचा फायदा ऊस उत्पादकांना होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावर्षी कारखान्याकडे ११ हजार ४७४ हेक्टरउसाची नोंद झाली असून ८ लाख ५२ हजार मेट्रिक टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या एमआरपीपेक्षा जास्त भाव कारखाना व्यवस्थापनाने जाहीर केला आहे. आतापर्यंत कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू करता येत नव्हता. तरीही कारखान्याने १५ लाख २६ हजार लिटर अल्कोहोलचे उत्पादन केले असून २२ मेगावॉट वीज निर्मिती केंद्रातून ४० लाख ९८ हजार युनिट वीज निर्माण केली. त्यातील २७ लाख ३० हजार युनिट वीज वितरित केली आहे, ऊस उत्पादकांनी गाळपासाठी ऊस द्यावा असे आवाहन मदन भोसले यांनी केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा