मकरसंक्रांतीला सहा दिवस उरले असताना शहरातील विविध भागात पतंगचा माहोल सुरू झाला आहे. मांजा आणि पतंग तयार करणाऱ्या दुकानदारांकडे गेल्या दोन दिवसांपासून गर्दी वाढू लागली आहे. नागपुरात मोठय़ा प्रमाणात पतंग व मांजाची बाजारपेठ असून मकरसंक्रांतीच्या निमित्ताने विदर्भात एक ते दीड कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती पतंग व्यवसायिकांनी दिली. एकीकडे विविध सामाजिक आणि पक्षीप्रेमी संस्थांकडून मांजावर बंदी आणावी, अशी मागणी होत असताना दुसरीकडे मात्र बाजारात मोठय़ा प्रमाणात मांजाची आगाऊ मागणी केली जात आहे.
शहरातील पतंगच्या बाजारपेठा वेगवेगळ्या आकारातील पतंग आणि मांजानी सजविल्या आहेत. नागपुरात बाबुळखेडा, बेझनबाग, तांडापेठ, हसनबाग, जुनी शुक्रवारी या भागात मोठय़ा प्रमाणात पतंग तयार करण्याचे कारखाने असून वर्षभर ते हाच उद्योग करीत असतात. गेल्या तीन दिवसांपासून थंडी कडाडली असली तरी काही उत्साही युवकांनी पंतग उडविणे सुरू केले आहे. त्यामुळे सायंकाळच्यावेळी आकाशात रंगबेरंगी पंतग दिसू लागताच मकरसंक्रांतीच्या उत्सवाचे वेध लागलेले दिसून येत आहे. मकरसंक्रांतीला बालकांपासून प्रौढांपर्यंत प्रत्येकजण संक्रांतीला पंतग उडविण्याचा आनंद घेत असतात. जुनी शुक्रवारी आणि इतवारी भागातील पंतंग आणि मांजाची बाजारपेठ सजून तयार आहे. शहरातील काही पतंग तयार करणाऱ्या कारखान्याला भेटी दिल्या असता बाबुळखेडा भागातील कैलास पाटील या व्यावसायिकाने सांगितले. पतंग आणि मांजा तयार करण्याचा व्यवसाय पिढीजात असून वर्षभर हा व्यवसाय करीत असतो. साधारणात दिवाळीनंतर या कामाला गती मिळत असते. माझ्याकडे चार कामगार असून शिवाय परिवारातील लोक मदत करीत असतात. वर्षांला किमान वेगवेगळ्या आकारातील एक लाखाच्या घरात पतंग तयार करीत असतो. आमच्याकडील माल केवळ नागपुरात नाही विदर्भ, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ या राज्यात जात असतो. पंतग तयार करणे ही कला आहे. एक मोठी पतंग तयार करण्यासाठी साधारणत: १५ ते २० मिनिटे लागतात, असेही पाटील म्हणाले. नागपुरात पतंगची मोठी बाजारपेठ असल्यामुळे या ठिकाणी कोटय़वधी रुपयांची उलाढाल होत असते. एका महिन्यात वेगवेगळ्या आकारातील ३ ते ४ हजार पतंग तयार करीत असतात. आमच्याकडून ठोक विक्री करणाऱ्यांकडे माल जात असतो. चिल्लर विक्री आम्ही करीत नसल्याचे पाटील यांनी सांगितले. बाजारात अग्नी, संखल आठ, महासंखल आठ, एके ५६, गेंडा, हातोडा, कलिंगडा, संखल अशा नावाचे मांजा विक्रीला आले आहे. मांजा बनवणाऱ्या दुकानदारांकडे आपल्या दोऱ्याला मांजाचे रूप देण्यासाठी धावपळ सुरू आहे. मांजाची निर्मिती करणारे कारागीर सध्या व्यस्त आहेत. अनेकांनी त्यांच्याकडे मांजा तयार करण्यासाठी आरक्षण केले आहे. चांगला मांजा तयार करण्यासाठी सध्या स्पर्धा लागली आहे.
जुनी शुक्रवारी भागातील पतंग आणि मांजानी बाजारपेठ सजली आहे. दुकांनामधील फिरक्यावर चमकणारे लाल, गुलाबी, निळा, पिवळा असे विविध रंग सर्वाना आकर्षित करीत आहेत. जुनी शुक्रवारीतील बाजारपेठेतील विक्रेत्यांनी सांगितले, गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी मांजाच्या किंमतीत वाढ झाली आहे. मांजा भरलेल्या चक्रीला यावर्षी मोठी मागणी आहे. वेगवेगळ्या कंपनीचे दोरा असलेले रील घेऊन वस्तीवस्तीमध्ये मांजा तयार करण्याचे प्रमाण कमी झाले असून मांजा भरलेली चक्रीची खरेदी करीत असतात मांजामध्ये ४० पेक्षा अधिक प्रकार आहे.
साधारणत: एका चकरीमध्ये ५ ते ६ रील मांजा असून २५० ते ३०० रुपयाला त्याची विक्री केली जाते. बरेली आणि संखलच्या मांजाचा दर्जा चांगला असल्यामुळे तो महाग आहे. विविध आकारातील रंगबेरंगी पतंग ५ रुपयापासून ३०० रुपयांपर्यंत विक्रीला आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा