‘व्हॅय काप्या..’, ‘दे ढील..’च्या आरोळ्यांनी शहराचा आसमंत आज दणाणून गेला आणि विविधरंगी, विविध आकारातील पतंगांनी आकाश. लहानांसह मोठय़ांनी दिवसभर गच्चीवर तळ ठोकत संक्रांतीचा पतंगोत्सव मोठय़ा जल्लोषात साजरा केला. अंधार पडेपर्यंत हा जल्लोष सुरू होता.
शहरातील उंच इमारतींच्या गच्च्या आज सकाळीच गजबजून गेल्या. काल (रविवार) रात्री उशिरापर्यंत पतंग, मांजाचीच तयारी सुरू होती. बागडपट्टीतील ही बाजारपेठ त्यासाठी मध्यरात्रीपर्यंत गजबजली होती. ही तयारी झाल्यानंतर आज सकाळीच पतंगबाजीची धांदल सुरू झाली. गच्चीवरच मोठय़ा ध्वनीक्षेपकाचा दणदणाट आणि सकाळपासूनच लाभलेली वाऱ्याची साथ यामुळे पतंगबाजीला बहरण्यास वेळ लागला नाही. अपार्टमेंटच्या इमारतींवर महिला मंडळांनीही मोठय़ा उत्साहाने त्यात सहभाग घेतला.
बाजारात आलेल्या चायना व तत्सम नायलॉनच्या मांजाविरोधात यंदा शहरात चांगली वातावरण निर्मिती झाली, मात्र आज त्याची बूज कोणी राखली असे दिसले नाही. सर्रास या तयार मांजावरच लोकांनी पतंगबाजीचा शौक पूर्ण केला. अलिकडे नव्यानेच आलेल्या प्रथेनुसार सायंकाळी अंधार पडताना पतंगबाजीच्या जोडीला फटाक्यांची जोरदार आतषबाजीही करण्यात आली. सकाळी गाण्यांच्या तालावर सुरू झालेल्या पतंगोत्सवाची सायंकाळी फटाक्यांच्या दण आवाजातच सांगता झाली.