‘ढिल दे.. दे.. दे दे रे भय्या..’ अशी साद घालत गुरुवारी ठिकठिकाणी आबालवृद्ध पतंग उडवण्याचे आपले कौशल्य पणाला लावताना दिसतील. यंदा संक्रांतीच्या निमित्ताने बालगोपाळांच्या लाडक्या छोटा भीमपासून ते थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या छबीने पतंग सजले आहेत. भारतीयच नव्हे तर थेट चायनीज, मलेशियन पंतगांनीही मुंबईमध्ये हजेरी लावली आहे. थोडक्यात यंदाच्या संक्रांतीला पतंगप्रेमींना पतंगांमध्ये जागतिक चेहरामोहरा पहायला मिळणार आहे.
डिसेंबरमध्ये गुलाबी थंडीची चाहूल लागताच ठिकठिकाणची दुकाने रंगीबेरंगी पतंगांनी सजू लागतात. जसजशी संक्रांत जवळ येते तसतसे आकाशामध्ये रंगीबेरंगी पतंग भिरभिरू लागतात. इमारतीच्या गच्चीवरून ‘काय पोछे’च्या आरोळ्याही कानी पडू लागतात. संक्रांत जवळ येताच मुंबईतील काही भागांमध्ये पतंग महोत्सवाचे आयोजन केले जाते आणि पतंगप्रेमींमध्ये कोणता पतंग चांगला, किती फुटाचा हवा, कोणचा फोटो हवा, मांजा कोणता चांगला यावर चर्चा सुरू रंगू लागते.
आपल्या करिष्म्याने लोकसभा निवडणुकीचे रणांगण गाजविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पतंगावरील छबी लक्ष वेधून घेत आहे. मोदींसोबतच बच्चेकंपनीचे लाडके छोटा भीम, कृष्णा हे कार्टुन्स, स्पायडरमन, रॉकेटचे फोटो तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हेही पतंगावर अवतरलेले आहेत. साधारणपणे दीड फुटापासून ते थेट पंधरा फुटांचे पतंग बाजारामध्ये उपलब्ध आहेत. १०० रुपयाला एक कोडी म्हणजे २० पतंग बाजारात विक्रीस आहेत. आकारमानानुसार पतंगाची किंमत ठरत असून छोटा पतंग पाच रुपयाला, तर त्यापेक्षा थोडा मोठा पतंग २० रुपयांना मिळत आहे. यंदा बाजारात भारतीय कागदी पतंगांसोबतच इंडोनेशियन, मलेशियन आणि चायनीज पतंगही उपलब्ध असून त्यांची किंमत साधारणपणे ४०० रुपयांपर्यंत असल्याचे वांद्रे येथील ‘लकी भारत काईट्स’चे नसीम काझी यांनी सांगितले. तसेच ग्राहक सजावटीसाठी स्वत:च्या पसंतीनुसार मेटलचे १५ ते २० फूट उंचीचे पतंग बनवून घेण्यासही पसंती देत आहेत आणि त्यांची किंमत ३ हजार रुपयांच्या आसपास आहे, असे ते म्हणाले.