संक्रांतीला शिवसेना देणार २१ हजार महिलांना रामपुरी चाकू
नवी दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या पाश्र्वभूमीवर आत्मसंरक्षणासाठी महिलांना सज्ज करण्याचा संकल्प शिवसेनेने सोडला आहे. त्याचाच एक भाग म्हणून दक्षिण मध्य मुंबईतील शिवसेनेच्या शाखांमधून तब्बल २१ हजार महिलांना संक्रांतीच्या हळदी-कुंकवानिमित्त रामपुरी चाकूचे वाण देण्यात येणार आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पहिल्या जयंतीचे निमित्त साधून येत्या २३ जानेवारी रोजी सायंकाळी दक्षिण मध्य मुंबईमध्ये रामपुरी चाकूच्या वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. बेस्ट बस, रेल्वेमधून प्रवास करताना महिलांना आंबट शौकिनांकडून त्रास सहन करावा लागतो. रोडरोमिओंकडूनही महिलांची छेडछाड केली जाते. अशा वेळी निव्वळ चीडचीड करण्यापलीकडे महिला काहीच करू शकत नाहीत. त्यामुळे आता शिवसेनेने महिलांना आत्मसंरक्षणासाठी सज्ज करण्याचा विडा उचलला आहे. सहा ते सात इंच लांबीचे २१ हजार रामपुरी चाकू खरेदी करण्यात येत असून २३ जानेवारी रोजी एका विशेष कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात ते महिलांना वितरित करण्यात येणार आहेत. त्यानंतर दक्षिम मध्य मुंबई विभागातील शिवसेनेच्या १९ शाखांमधून त्यांचे वितरण करण्यात येणार आहे. मात्र हे रामपुरी चाकू खंडणी वसुली अथवा परस्परांमध्ये मारामारी करण्यासाठी देण्यात येत नसून महिलांनी आत्मसंरक्षणासाठी त्याचा वापर करावा, असे आवाहन शिवसेनेचे दक्षिण मध्य मुंबईचे विभागप्रमुख अजय चौधरी यांनी केले आहे. रामपुरी चाकू बाळगल्यामुळे कायद्याचा प्रश्न निर्माण झाला, तर संबंधित महिलेच्या पाठिशी शिवसेना खंबीरपणे उभी राहील. हा रामपुरी चाकू महिलांना आत्मसंरक्षणासाठी देण्यात आल्याची ओळख पोलिसांना पटावी यासाठी त्यासोबत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांचे छायाचित्र असलेली की-चेन जोडण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.
महिलांना स्वयंसिद्ध
करण्याचा संकल्प
महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी १५ दिवसांचे प्रशिक्षण देण्याचा संकल्प दक्षिण मुंबई शिवसेनेने सोडला आहे. गिरगाव परिसरातील शाळेमध्ये हे वर्ग भरविण्यात येणार आहेत. भुरटे चोर, आंबटशौकीन, गुंड यांच्यापासून स्वत:चे संरक्षण कसे करावे याचे प्रशिक्षण या वर्गात देण्यात येणार आहे. हळूहळू कुलाबा, मुंबादेवी आणि मलबार हिल विधानसभा मतदारसंघातही असे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येतील, अशी माहिती शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा