कासारवाडीतील रमेश ज्वेलर्स दुकानातील सराफावर भरदुपारी दोन अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने हल्ला करून दुकानातील सर्व सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. सोमवारी दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात सराफ गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
नरेंद्र चंपालाल जैन (रा. पाश्र्वनाथ सोसायटी, कासारवाडी) असे जखमी झालेल्या सराफाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासारवाडी येथील पवार चाळीत जैन यांचे रमेश ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या ठिकाणी सोने गहाण ठेवणे व विक्री करण्याचा व्यवसाय ते करतात. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास जैन हे दुकानात एकटेच होते. त्यावेळी आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार चाकूने वार केले. दुकानातील सर्व सोने-चांदीचे दागिने घेऊन ते पसार झाले. घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलीस, परिमंडळ तीनचे उपायुक्त शहाजी उमप, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
जखमी जैन यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची परिस्थिती स्थिर आहे. पोलिसांना घटनास्थळी एक धारदार चाकू मिळाला आहे. श्वानपथकाला घटनास्थळी बोलाविण्यात आले होते. त्याने हल्लेखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. जैन यांचे भाऊ हे आजारी असून नेरेंद्र जैन हे सुद्ध गंभीर जखमी असल्यामुळे दुकानात नेमक्या काय वस्तू होत्या व किती ऐवज चोरी झाला आहे, याची माहिती पोलिसांना मिळालेली नाही. या प्रकरणी तक्रार दाखल झालेली नाही. पोलिसांनी जैन यांच्या पुतण्याला घटनेची माहिती दिली असून तो आल्यानंतर कितीचा ऐवज चोरीला गेला आहे, हे समोर येईल. या प्रकरणी भोसरी पोलीस व गुन्हे शाखेचे पोलीस अधिक तपास करत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा