ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान ही एकविसाव्या शतकातील सर्वात मोठी शक्ती आहे. या बाबींचा योग्य वापर करूनच देशाला पुढे नेता येईल. तरुणांनी दूरदृष्टी ठेवून व सकारात्मक विचार करून पाऊल टाकले तर देशाचा सर्वागीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम विश्वास भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.  
युथ विदर्भ स्टेट व वेदतर्फे मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित युवा संमेलनात गडकरी बोलत होते. यावेळी वेदचे अध्यक्ष देवेंद्र पारेख व संमेलनाचे संयोजक आशिष देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. या संमेलनात संपूर्ण विदर्भातील काही मोजक्या महाविद्यालयातील जवळपास आठ ते दहा हजार युवक-युवती सहभागी झाले. गडकरी युवकांना म्हणाले, यशस्वी व्हायचे असेल तर चांगले गुण आत्मसात करा. प्रबोधन, प्रशिक्षण, संशोधन आणि विकास या गोष्टींवर अधिक भर द्या. सकारात्मक विचार ठेवले तर शंभर टक्के यशस्वी होता येते. आपले जीवन बदला आणि त्यानंतर इतरांचे जीवन बदला. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस, हे सूत्र लक्षात ठेवा. नोकरी मागू नका, नोकरी देणारे बना, असा सल्लाही त्यांनी दिला.
विकासासाठी उद्योग, पाणी, ऊर्जा, दळणवळणाची साधने व योग्य सुसंवाद आवश्यक आहे. विदर्भात कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही, पण विकासाच्या दृष्टीने त्याचा योग्य वापर केला जात नाही. देशात खूप श्रीमंत लोक आहेत. सुपीक जमीन आहे. भरपूर खनिज संपत्ती आहे. तरीही दारिद्रय़, बेरोजगारी मोठय़ा प्रमाणात आहे. लाखो लोकांना एकवेळचे पोटभर अन्नही मिळू शकत नाही. ही स्थिती का आली? याचा आत्मशोध तरुणांनी घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले.
 विदर्भातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत बदल घडून यावा, त्यांचे जीवनमान उंचवावे, यासाठी पूर्ती कंपनी विविध उपक्रम राबवत आहे. या विविध उपक्रमांमध्ये विदर्भातील हजारो तरुणांना रोजगार प्राप्त झाला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी हे मौदा येथे ‘फोर जी’  प्रकल्प उभारत आहेत. तत्पूर्वी त्यांनी यासंदर्भात चर्चा करण्यासाठी माझी भेट घेतली. या प्रकल्पासाठी जवळपास दोन हजार अभियंते लागणार असून त्यात विदर्भातील तरुणांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. या प्रकल्पासाठी इच्छुकअसणाऱ्या अभियंत्यांनी त्यांचा तपशील माझ्या ई-मेलवर पाठवावा, असे आवाहन गडकरी यांनी केले.
यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शंकेचे निरसनही गडकरी यांनी केले. आजच्या परिस्थितीत राजकारण सेवा आहे की व्यवसाय, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, प्रत्येक क्षेत्रात चांगले आणि वाईट लोक असतात. तसेच राजकारणातही आहेत. प्रत्येक राजकीय पक्षात चांगले लोक आले पाहिजे. जसा समाज तसे नेतेही होतात. त्यामुळे लोकांनी चांगले नेते निर्माण केले पाहिजे. कार चांगली आहे, पण चालक लायक नसल्यास अपघात झाला तर आपण चालकाला दोष देतो. तसेच राजकारणाचे आहे. चांगले नेते नागरिकच घडवू शकतात. राजकारण हे पैसे कमवण्याचे साधन नसून ते सेवेचे माध्यम आहे. पैसे कमावण्याच्या उद्देशाने राजकारणात पडूच नये, असा सल्लाही त्यांनी दिला. मिहान प्रकल्प पूर्णत्वाच्या वाटेवर राहिला असता तर आणखी रोजगार उपलब्ध झाला असता. परंतु राजकारणामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास अडचणी येत असल्याचेही गडकरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
आशिष देशमुख यांनी प्रास्ताविकातून युवा संमेलन आयोजित करण्यामागची भूमिका विशद करून वेगळ्या विदर्भ राज्यासाठी युवकांनी पुढे येण्याचे आवाहन केले. अभिनंदन पळसापुरे यांनी गडकरी यांचा परिचय करून दिला. देवेंद्र पारेख यांनी आभार मानले.
राष्ट्रगीताने या महोत्सवाची सांगता झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा