गेल्या अनेक वषार्ंपासून कासवगतीने काम सुरू असलेल्या सावनेर तालुक्यातील कोच्छी प्रकल्पासाठी राज्य शासनाने १४० कोटी रुपये द्यावे, अशी मागणी राजेंद्र मुळक यांनी मंगळवारी विधान परिषदेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत केली. यावेळी त्यांनी ताजबाग सौंदर्यीकरणासह शहरातील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयासाठी अधिक निधीची तरतूद करण्याची सूचनाही केली.
पुरवणी मागण्या चर्चेदरम्यान सुरुवातीला राजेंद्र मुळक व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात ठिणगी पडली. चर्चेला सुरुवात करताना मुळक यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत बोलण्यास सुरुवात केली. त्यामुळे अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी पुरवणी मागण्यादरम्यान केवळ मागण्यांचा उल्लेख करावा, अशी सूचना केली. त्यावर मुळक यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीच्या पाश्र्वभूमीने सुरुवात करीत होतो. अर्थमंत्र्यांनी मला सांगण्याची गरज नाही, असे सांगितले. सभापती शिवाजीराव देशमुख यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर मुळक यांनी सिंचनासाठी ११८ कोटी ६० लाख २४ हजार रुपयांची गरज व्यक्त केली. कोच्छी प्रकल्पासह पेंच प्रकल्पाच्या शिल्लक कामासाठी ११० कोटी देण्याची मागणी केली.
सेवाग्राम येथील महात्मा गांधीच्या निवासस्थानाच्या विकासासाठी ५५० कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला. ५० कोटी देण्यात आले होते. सध्या याबाबत काय स्थिती आहे. आता किती निधी देणार आहे हे मंत्र्यांनी स्पष्ट करावे, असे ते म्हणाले. ताजबाग सौंदर्यीकरणासाठी २०० कोटी रुपये मंजूर असून ३० कोटी देण्यात आले होते. येथील पुढील कामाबाबतची भूमिका स्पष्ट करावी, असेही ते म्हणाले.
यावेळी गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थ्यांंसाठी वसतिगृह, ओबीसींची शिष्यवृत्ती, जेएनएनएनयूआरएम योजना बंद केल्याने महापालिकेसाठी नवी योजना, नागपूर गडचिरोली चौपदरीकरण्यासाठी निधी आदींकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी गोरेवाडा प्राणिसंग्रहालय, होमगार्डच्या मानधनात वाढ, राष्ट्रीय उद्यान, अभयारण्य परिसरातील कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी अतिरिक्त निधी देण्याची मागणी केली. रामनाथ मोते, निरंजन डावखरे, निलम गोऱ्हे आदी चर्चेत सहभागी झाले होते.