पृथ्वीतलावर मनुष्यप्राणी जन्माला आल्यानंतर सुरुवातीचा काही काळ तो इतर प्राण्यांप्रमाणे जगला, वागला असला तरी मानवी उत्क्रांतीच्या पुढच्या टप्प्यांत त्याचा मेंदू जसजसा प्रगत, प्रगल्भ, परिपक्व होत गेला तसतसा त्याला आपल्या अस्तित्वाचा, त्याच्या प्रयोजनाचा प्रश्न सतावू लागला. आपल्या आयुष्याच्या पूर्णत्वाचा ध्यास त्यानं घेतला. जीवनातील अंतिम सत्य काय, त्यात आपली भूमिका कोणती, हे त्याला जाणून घ्यावंसं वाटू लागलं. त्यातून तो स्वत:लाच प्रश्न विचारू लागला. त्यांच्या उत्तरासाठी जंग जंग पछाडू लागला. सनातन काळापासून आजवर हा शोध जारी आहे. त्याचं एकच एक ठोस उत्तर अजून तरी माणसाला मिळालेलं नाही. बुद्धी, मन, जाणिवा, संवेदना, सुख-दु:खं, भावभावना आदींचा तळ धुंडाळण्याच्या माणसाच्या प्रयत्नांतूनच नानाविध विद्याशाखांचा जन्म झाला. त्यांतून तो ‘आपला’ शोध घेऊ लागला. शरीराशी निगडित काही प्रश्नांची उत्तरं त्यातून त्याला सापडलीही; परंतु त्यापल्याडही अगणित प्रश्न अद्यापि अनुत्तरितच आहेत. अर्थात त्यांचा पाठलाग माणसानं सोडलेला नाही. केवळ पृथ्वीतलावरील गोष्टींचाच नाही, तर भोवताली पसरलेल्या जगड्व्याळ, अथांग विश्वाचाही थांगपत्ता लावण्याची त्याची जिज्ञासा अविरत प्रज्ज्वलित आहे. ही ज्ञानपिपासा कधीच शमणारी नाही. यातूनच कधीतरी मानवी प्रज्ञेला त्याच्या अस्तित्वाच्या प्रयोजनाचा शोध लागेलही; कुणी सांगावे! परंतु सध्यातरी दूर-दूपर्यंत त्याचा मागमूस दिसत नाहीए, हेही खरंय. लेखक श्याम मनोहर यांनाही असेच (लोकांच्या दृष्टीनं ‘जगावेगळे’!) नाना प्रश्न नेहमी सतावत राहतात. त्यांच्या उत्खननातून आणखीन नवीन नवीन प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे श्यामरावांचा शोध काही केल्या संपतच नाही. त्याचीच परिणती म्हणजे त्यांचं लेखन! त्यात मग स्वाभाविकपणेच मानवी जगण्यातली, त्याच्या विचारांतली, उक्ती-कृतींमधली असंगतता (अ‍ॅब्सर्डिटी) उतरते. परिणामी बऱ्याचदा त्यांना त्यांच्या लेखनातून नेमकं काय म्हणायचंय, याबद्दल वाचणारा गोंधळात पडतो. त्यांना नक्की काही म्हणायचंय का? की उगीचच शब्दांशी, त्यांच्या अर्थाशी (वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थाशीही!) खेळण्यात त्यांना मौज वाटते म्हणून ते पांढऱ्यावर काळं करतात? श्यामरावही असे, की आपल्याला नक्की काय म्हणायचंय, याचा खुलासा करण्याच्या भानगडीत ते पडत नाहीत. ज्याचा त्यानं आपल्याला पाहिजे तो, किंवा आपल्याला आकलन होईल तो अर्थ ज्यानं त्यानं काढावा! श्यामरावांच्या या पवित्र्यामुळे काहीजण त्यांच्या वाटेला जायला घाबरतात. तरीही ते एक महत्त्वाचे लेखक आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आजवर अनेकांनी श्यामरावांची नाटकं मंचित केलेली आहेत. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांचे रंगाविष्कार सादर केले आहेत. त्यांतून श्यामरावांचं चिंतन आपापल्या आकलनानुसार मांडण्याचा अनेकांनी प्रयत्न केलेला आहे. दिग्दर्शक दीपक राजाध्यक्ष यांनीही ‘आविष्कार’ निर्मित ‘शंभर मी’ या ताज्या रंगाविष्कारात श्यामरावांचं लेखन रंगाविष्कारित केलं आहे.
मनुष्य जन्माला आल्यापासून त्याच्यातला ‘मी’ सक्रीय होतो. खरं तर त्याही आधीपासून तो अस्तित्वात असतो. मातेच्या गर्भात असलेल्या ‘त्या’ला आपण कोण, आपलं लिंग काय असणार, आपण कुठल्या देशात, कुठल्या धर्मात, कुठल्या जातीत जन्मणार? आपली- म्हणजे आपल्या आई-वडिलांची सांपत्तिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वगैरे वगैरे स्थिती काय असेल?.. असे अनेक प्रश्न पडू शकतात. आपल्या जन्मासाठी आई-वडिलांनी किती आणि काय काय ‘कष्ट’ घेतले असतील, याबद्दलही त्या जीवाला उत्सुकता असू शकते.
इथून मग ‘त्या’ची अखंड शोधयात्रा सुरू होते. आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर त्याचं शरीर, बुद्धी, मन, भावना, जाणिवा, संवेदना नाना प्रकारचे अनुभव घेत, ते पचवत, त्यांचा आपल्या परीनं अन्वयार्थ लावत असतं. भोवतीची आर्थिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक परिस्थिती त्याच्यावर जे संस्कार करते, त्यांतून त्याचं जीवनाबद्दलचं आकलन वाढत जातं. त्याची मूळ वृत्ती-प्रवृत्तीही त्यात मिसळते.
पण हे आकलन समग्र असतं का? तर- नाही.
श्याम मनोहरांना भाषेबद्दलचे, धर्माबद्दलचे, शरीराबद्दलचे, शारीर जाणिवांबद्दलचे, सुख-दु:खाबद्दलचे, त्रासांबद्दलचे, स्वप्नांबद्दलचे, मृत्यूबद्दलचे, भोवतालातील वस्तुमात्रांबद्दलचे असे अनेकानेक प्रश्न पडत राहतात. त्यांचं खोदकाम करताना त्यांना काही गमतीशीर गोष्टी हाती लागतात. त्यातून सत्याचे काही तुकडे त्यांना गवसतात. केव्हा केव्हा काहीतरी सापडल्यासारखं वाटतं, पण ते नुसतंच वाटणं असतं. प्रत्यक्षात हाती काही लागत नाही. आणि या सगळ्याच्या केन्द्रस्थानी ‘मी’ असतो. या ‘मी’ला जे जे प्रश्न पडतात त्यांची तो उत्तरं मिळवू बघतो. त्यात कधीतरी मग अचानक कुठंतरी उगवलेलं ‘मंदिर’ असतं. ‘खोली’ (ीिस्र्३ँ) असते. ‘दारू’ असते. ‘नितंब’ असतं. चित्रविचित्र ‘स्वप्नं’ असतात. हास्यक्लबमधला ‘विनोद’ असतो. मृत्यूचं भय असतं. सेक्ससंबंधात पडणारी कोडी असतात. ‘शरीराच्या बाह्य़ अवयवांचं सौंदर्य जपलं जातं, पण शरीराआतल्या अवयवांच्या सौंदर्याचं काय?’ हाही प्रश्न श्यामरावांना पडला आहे. या स्वैर, स्वच्छंदी प्रश्नभुंग्यांना सामोरं जाताना त्यांना काही गोष्टी आकळतातसुद्धा; परंतु पूर्णाशांनं नाही.
‘शंभर मी’मध्ये श्यामरावांच्या या गमतीशीर शोधात दिग्दर्शक दीपक राजाध्यक्ष आणि त्यांची कलावंत मंडळी सामील झाली आहेत. त्यांचा हा शोध पूर्णत्वाला गेलाय का? याचं उत्तर ‘नाही’ असंच द्यावं लागेल. श्याम मनोहरांची ही जी काही कादंबरीसदृश रचना आहे, ती मंचित होताना त्यातले काही असंगत तुकडे आपल्यासमोर उलगडतात. त्यांचा परस्परांशी काही संबंध नसतो. जसं एकाच वेळी माणसाच्या जीवनात नानाविध घटना घडत असतात. त्यांतून त्याच्या मनात अनेक विचार, विकार उद्भवतात. आणि त्या सगळ्याच्या एकत्रित घुसळणीतून होणारी त्याची अभिव्यक्ती याचा बऱ्याचदा ताळमेळ असत नाही. रंगावृत्तीकार व दिग्दर्शक दीपक राजाध्यक्ष यांनी श्यामरावांना सतावणारी ही असंगतता जशीच्या तशी रंगमंचावर मांडली आहे. मनुष्याचा जन्म (त्याआधीची गर्भावस्थाही!) ते मृत्यू यामधला ‘मी’चा प्रवास.. या वाटचालीत त्याला येणारे असंख्य अनुभव, पडणारे प्रश्न, त्यांचा गुंता आणि त्याच्या सोडवणुकीच्या धडपडीतून निर्माण होणारे आणखीन काही नवेच प्रश्न.. हे सगळं नटांच्या शारीर तसंच वाचिक अभिव्यक्तीतून दिग्दर्शक पोचवू पाहतो. काही वेळा ते पोचतं. काही वेळा नीटसं पोचत नाही. नट काही ठिकाणी कमी पडतात, किंवा मग त्यांचं आकलन कमी पडत असावं. त्यामुळे या रंगाविष्काराचा एकसंध परिणाम साधत नाही. पं. सत्यदेव दुबेंचा दिग्दर्शकावरील प्रभाव दोन दृश्यांच्या मधील संगीत-तुकडय़ांतून जाणवतो. रवी-रसिक यांनी स्तरीय नेपथ्यातून विविध स्थळं उपलब्ध करून दिली आहेत. प्रकाशयोजनेतून त्यांनी काळाचे संदर्भ स्पष्ट केले आहेत. मयुरेश माडगावकर यांच्या पाश्र्वसंगीतातून वातावरणनिर्मिती होते. मानसी जोशी व सोनल खळे यांनी वेशभूषेतून पात्रांना दर्शनी चेहरा दिला आहे. विवेक लागू, आशुतोष दातार, दीपक दामले, सुनील जोशी, सुदेश बारशिंगे, विक्रांत कोळपे, डॉ. मंगेश क्षीरसागर, संतोष सरोदे, अभिजीत सुर्वे, स्निग्धा सबनीस, मानसी जोशी, अनघा देशपांडे आणि सोनल खळे या कलाकारांनी श्यामरावांचं हे प्रश्नोपनिषद आपापल्या परीनं पोचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले आहेत.