कोकण इतिहास परिषदेचे चौथे वार्षिक अधिवेशन नवीन पनवेल येथील चांगा काना ठाकूर महाविद्यालयात १८ ते १९ जानेवारीदरम्यान होणार आहे. बौद्ध वाङ्मय आणि पाली भाषेच्या तज्ज्ञ डॉ. मीना तालीम या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. प्राचीन कोकण सत्राचे अध्यक्षपद अलाहाबाद विद्यापीठाचे डॉ. रॉय, मध्ययुगीन कोकणचे अध्यक्षपद डॉ. कुरूष दलाल, तर आधुनिक कोकण सत्राचे अध्यक्षस्थान डॉ. उमेश बगाडे भूषवणार आहेत. कोकण इतिहास परिषदेच्या वतीने ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बुधवारी ही माहिती देण्यात आली.
कोकण इतिहास परिषदेच्या अधिवेशनात दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार इतिहासकार व मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. जे. व्ही. नाईक यांना देण्यात येणार आहे. नाईक यांनी इंडियन हिस्टरी काँग्रेस आणि महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले असून ते राजा राममोहन रॉय फाऊंडेशन, मणीभवन गांधी संग्रहालय आणि आयसीएचआरचे ते सदस्य आहेत. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासावर केलेल्या संशोधनाबद्दल त्यांचा हा गौरव करण्यात येणार आहे. यंदा प्रथमच कोकणावरील संशोधनपर ग्रंथास अधिवेशनात पुरस्कार देण्यात येणार आहे. गेल्या वर्षी गोवा येथे झालेल्या अधिवेशनातील शोधनिबंधाचे पुस्तकप्रकाशन या अधिवेशनात होणार आहे, अशी माहिती इतिहास परिषदेचे कार्यवाह सदाशिव टेटविलकर यांनी दिली.
या वेळी कोकण इतिहास परिषदेच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. या अंकात कोकणी मुसलमानांची ऐतिहासिक पूर्वपीठिका (डॉ. दाऊद दळवी), महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजा भवानी-ऐतिहासिक संदर्भ (रवींद्र लाड), प्राचीन व मध्ययुगीन ठाणे-सांस्कृतिक (सदाशिव टेटविलकर), कोकणचे कोकम (डॉ. अभय कानेटकर) आदी लेखांचा यात समावेश आहे.

Story img Loader