मागील आठ, दहा दिवसात जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला असला तरी पावसाचे आगार समजल्या जाणाऱ्या अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात अद्याप पाऊस नाही. मुळा, भंडारदरा, आढळा धरणांच्या पाणलोट क्षेत्राला मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा असून कळसूबाई, हरिश्चंद्रगडाच्या डोंगररांगा मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाळ्यात तीन ते पाच हजार मिमी पाऊस पडतो. हा पाऊस नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पडतो. मान्सूनपूर्व पाऊस या भागात फ़ारसा पडत नाही त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असताना एखाद्या दिवसाचा अपवाद वगळता पाणलोट क्षेत्रात म्हणावा असा पाऊस अद्याप पडलेला नाही. रोहिणी संपल्या, मृग नक्षत्राची सुरुवातही अडथळतच झाली आहे. पावसाळी वातावरण असले तरी पाणलोट क्षेत्रात अद्याप मान्सूनचे आगमन झालेले नाही. मुंबई, ठाणे परिसरात मान्सून येऊन पोहचल्यानंतर चार पाच दिवसात घाटमाथा ओलांडून तो मुळा, भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात प्रवेश करतो. मात्र यावर्षी अद्याप मुंबई परिसरात पावसास सुरुवात झालेली नाही. त्यामुळे पाणलोट क्षेत्रही अद्याप तहानलेलेच आहे. जूनच्या प्रारंभी एक दिवस मान्सूनपूर्व पावसाच्या चांगल्या सरी कोसळल्या. पावसाळी वातावरण निर्माण झालेले आहे त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांनी भातरोपाचा पेरा केला असून पेरणीपूर्व मशागतीच्या कामात ते मग्न आहेत. मात्र अद्यापही ओढे, नाले सुकलेलेच असून धरणांमध्ये नविन पाण्याची आवक नाही. तुलनेने तालुक्याच्या पश्चिम भागात काही ठिकाणी चांगला पाऊस पडला.

Story img Loader