२१ ते २३ एप्रिल या कालावधीत ‘कोकण मित्रोत्सव’चे आयोजन येथे करण्यात आले आहे. तीन दिवस चालणा-या या खाद्योत्सवासह विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कोकण मित्रमंडळाचे अध्यक्ष विनोद घोटगे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.  कोकणातून कोल्हापूरमध्ये स्थायिक झालेल्या नागरिकांनी कोकण मित्रमंडळाची स्थापना १९७६ साली केली. वि. स. खांडेकर हे पहिले अध्यक्ष होते. आतापर्यंतच्या प्रवासात मंडळाच्या वतीने अनेक कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविले आहेत. यंदाच्या कोकण मित्रोत्सवामध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणी पद्धतीने बनविलेल्या सुरमई, पापलेट, बांगडा व इतर मत्स्याहार, वडा-कोंबडा अशा मांसाहारी पदार्थाबरोबर उकडीचे मोदक, घावण-घाटले, सोलकडी, फणस-पोळी, मालवणी खाजा यासारख्या कोकणच्या मेव्याचा समावेश खाद्योत्सवात केलेला आहे. मालवणी मसाले, कुळथाचे पीठ, आमसूल तेल, केरसुण्या या वस्तूही विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.
कोकण मित्रोत्सव म्हणजे कोल्हापुरात विखुरलेल्या कोकणवासीयांचे स्नेहसंमेलन असते. त्यामुळे  या कालावधीत सभासद, महिला, मुले यांचे मोफत वैद्यकीय शिबिर, पाककला व वेशभूषेसारख्या स्पर्धा, मनोरंजनाचे कार्यक्रम, महिला सबलीकरणावर प्रा.वासंती रासम यांचे व्याख्यान, सत्कार, कोकण मित्र मुखपत्राचे प्रकाशन, स्पर्धा परीक्षेसाठी तयारीचे व्याख्यान आदी कार्यक्रम आयोजित केले आहेत. २३ एप्रिल रोजी सांगता समारंभामध्ये शेला पागोटे, सत्कार, बक्षीस समारंभ तसेच नाद सुरमय प्रस्तुत ‘अशी पाखरे येती’ हा गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमांचा मुख्य उद्देश  कोकणची कोल्हापूरशी असलेली नाळ बळकट करणे आणि कोकणातील संस्कृतीची इथल्या लोकांना ओळख  करून देणे हा आहे. यावेळी उपाध्यक्ष मोहन गांवकर, सचिव अजयराज वराडकर, कार्याध्यक्ष सुभाष हडकर, खजिनदार नागेश राणे, अमोल कोरगांवकर आदी उपस्थित होते.