कोकण रेल्वेमार्गावर चिपळूण ते रत्नागिरीदरम्यान रिकाम्या मालवाहू रेल्वेचे चार डब्बे मुंबईला येताना घसरल्याने सकाळी कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाडय़ा पनवेल, कळंबोलीदरम्यान दोन तासांसाठी रोखण्यात आल्या.
चिपळूण ते रत्नागिरी लोहमार्गावरील एका बोगद्यात ही घटना घडल्याचे पनवेलचे स्टेशन मास्तर डी. के. गुप्ता यांनी सांगितले. याचा फटका कोकणात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना बसला. पुढील सूचना मिळेपर्यंत पनवेलमध्ये मंगला एक्स्प्रेस, मांडवी आणि मत्स्यगंधा या एक्स्प्रेसमधील सहा हजार प्रवाशांना तब्बल दोन तास थांबावे लागले. यातील अनेक प्रवाशांनी कोकणात रेल्वेने प्रवास करण्याचा बेत टाळत तिकीट परतवून घेतले. तशी सोय पनवेल स्थानकात करण्यात आली. यासाठी प्रवाशांच्या उडालेल्या झुंबडीमुळे सकाळी दहा वाजता तिकीट परताव्यासाठी प्रवाशांची एकच गर्दी तिकीट खिडकीवर पाहायला मिळाली. तीन खिडक्यांमधून परताव्याला सुरू करूनही ही गर्दी कमी होत नव्हती. अखेर ११ वाजता कोकणात जाणारा रेल्वेमार्ग मोकळा झाल्याची घोषणा झाली. प्रवाशांनी पुन्हा गाडी, सीट पकडण्यासाठी धाव घेतली. सव्वा ११ वाजता पनवेल रेल्वेस्थानकातून मांडवी एक्सप्रेस रवाना झाली आणि प्रवाशांचा जीव भांडय़ात पडला.