प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने यावर्षी प्रथमच मुंबईत मरीन ड्राईव्हवर झालेल्या संचलनात महाराष्ट्र शासनाच्या महसून आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या चित्ररथांनी लक्ष वेधले असले तरी या चित्ररथांची संकल्पना व निर्मिती कोल्हापुरातील मयूर प्रकाश कुलकर्णी यांच्या अँडवे डिझाईन स्टुडिओने केली होती. शिरढोण येथील धर्मगिरी झांज पथकाच्या उत्स्फूर्त सहभागासह लक्षवेधी ठरलेल्या महसूल विभागाचा चित्ररथ राज्यभर फिरवण्याचा राज्य शासनाच्या पातळीवर विचार सुरू आहे.
प्रजाकसत्ताक दिन सोहळयाचा भाग म्हणून या वर्षी प्रथमच मुंबईत सेनादलाचे तीनही विभाग तसेच राज्य शासनाच्या सर्व विभागाचे चित्ररथ यासी विशेष संचलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्य शासनाच्या विविध विभागांचे एकूण अठरा चित्ररथ या संचलनात सहभागी होते. त्यापकी महसून विभागने सुवर्ण जयंती राजस्व अभियान योजनेंतर्गत ज्या सहा नवीन योजना राबवण्यातस सुरुवात केली आहे त्याबाबतची माहिती चित्ररथाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्याचे ठरवले होते. यासंदर्भात कशाप्रकारे चित्ररथ बनवता येईल याबाबतचे प्रस्ताव संबंधित विभागाने मागवले तेव्हा महाराष्ट्रातील कलाकारांनी त्यासाठी आपले प्रस्ताव दिले आणि त्यापकी मयूर कुलकर्णी यांची संकल्पना निवड समितीने स्वीकारली. ती कलात्मकरीत्या सादर करताना मयूर कुलकर्णी यांनी दान मावळे भव्य पालखीतून सुवर्ण जयंती राजस्व अभियानाच्या योजना मिरवत असल्याचा चित्ररथ बनवला. साठ फूट लांब, वीस फूट उंच आणि पंधरा फूट रुंद असा हा चित्ररथ आकाराला आणण्यासाठी एॅडवे डिझाईन स्टुडिओला उल्का आर्ट्सचे शीतल दुर्गुळे तसेच त्यांच्या सहका-यांची साथ लाभली. विशेष म्हणजे महसूल विभागाच्या चित्ररथांसमोर शिरोळ तालुक्यातील शिरढोण येथील धर्मगिरी झांज पथकाचे साठ हौशी सदस्य लयबध्दपणे झांजपथकाचा कार्यक्रम सादर करत होते. सुशिक्षित पण केवळ छंद म्हणून ढोल व झांज वाजवणा-या या तरुणांच्या पथकाने मुंबईकरांना आपल्या ठेक्यावर डोलायला लावले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागनेही त्यांचा चित्ररथ करण्याबाबत मयूर कुलकर्णी यांची संकल्पना महाराष्ट्रभरातून आलेल्या प्रस्तावांमधून स्वीकारली या विभागाचा चित्ररथ करताना महाराष्ट्र नरबळी व जादूटोणा विरोधी कायद्याची माहिती लोकांपर्यत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या दोन्ही चित्ररथांच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्हय़ातील एकूण ऐंशी कलाकारांना मुंबईतील प्रजासत्ताक दिन सोहळा संचलनात आपली कला सादर करता आली.
दरम्यान मुंबईकरांनी महसून विभागाच्या चित्ररथाला दिलेली दाद लक्षात घेता हा चित्ररथ महाराष्ट्रभर फिरवून सुवर्णजयंती राजस्व अभियानाच्या सर्व योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवता येतील असे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना जाणवल्याने आता चित्ररथ गावागावांपर्यंत नेण्याच्या दृष्टीने काही आयोजन करता येईल का, या दृष्टीने शासकीय पातळीवर विचार सुरू झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा