मुंबईतीली २६/११ हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला फाशी दिल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्य़ात सर्वत्र जल्लोष व्यक्त करण्यात आला. अनेक भागांमध्ये साखर वाटप करून नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
अजमल कसाब याला फाशी दिल्याची माहिती नागरिकांना वृत्त वाहिन्यांवरून सकाळी लवकरच मिळाली. त्यावरून नागरिक गटागटाने चर्चा करीत होते. तर अनेक नागरिकांनी महाव्दार रोड, शिवाजी चौक, बिनखांबी गणेश मंदिर आदी भागांमध्ये साखर वाटप केले. दाभोळकर कॉर्नर येथील जिल्हा काँग्रेस भवनात जमलेल्या कार्यकर्त्यांनीही साखर वाटप केली. यामध्ये मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांचाही समावेश होता. सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अस्थिकलश प्रायव्हेट हायस्कूल येथे दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. तेथे कसाबला फाशी हीच सेनाप्रमुखांना श्रध्दांजली अशा आशयाचे फलक लावण्यात आले होते. कसाबला दिलेल्या फाशीच्या निर्णयाचे सर्व थरातील नागरिकांनी स्वागत केले आहे. आता अफजल गुरू यालाही लवकरच फाशीवर चढवावे, अशी मागणी करताना नागरिक दिसत होते.
इचलकरंजी येथे कॉ.मलाबादे चौकात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी साखर वाटप केली. त्यामध्ये माजी शहराध्यक्ष धोडिंराम जावळे, गोपाल जासू, पांडुरंग म्हाटुगडे, किरण कटके, राहुल निमणकर, हणमंत वाळवेकर, विनोद काम्कानी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा