प्रचंड थकबाकीवरून आर्थिक अडचणीत आलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासनाने बडय़ा थकबाकी संस्थांविरुद्ध सोमवारपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कोल्हापूर जिल्ह्य़ात ५० प्रमुख संस्थांकडे १५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. यापैकी प्रमुख संस्थांच्या कार्यालयासमोर बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनात २५० अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश होता. ज्या संस्थांनी थकबाकी वसुलीसाठी सकारात्मक चर्चा सुरू केली आहे, तेथील आंदोलन मागे घेण्यात आले आहे. तर उर्वरित संस्थांसमोरील आंदोलन सुरूच राहणार आहे.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मोठी थकबाकी आहे. थकबाकी वसुलीसाठी प्रशासक प्रताप चव्हाण व बँकेच्या अधिकाऱ्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. वसुली अधिक प्रभावी व्हावी, यासाठी प्रमुख ५० संस्थांसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. १७ नोव्हेंबरपासून आंदोलन सुरू होणार होते. मात्र ऊस उत्पादक शेतक ऱ्यांचे आंदोलन सुरू झाल्याने व जमावबंदी आदेश लागू झाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.
सोमवारी ठिय्या आंदोलनाला नव्याने सुरुवात झाली. तालुकानिहाय बँकेच्या अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले. त्यांनी थकबाकी असलेल्या संस्थांसमोर जाऊन बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. कोल्हापुरातील शाहू मार्केट यार्ड नागरी पतसंस्था, मंगलमूर्ती पतसंस्था, कोल्हापूर जिल्हा खरेदी विक्री संघ, भुदरगडमधील पश्चिम भुदरगड नागरी पतसंस्था, कागलमधील कोल्हापूर जिल्हा वाहनधारक पतसंस्था, पन्हाळा तालुक्यातील महालक्ष्मी पाणीपुरवठा पतसंस्था, बोरपाडळे, राधानगरी तालुक्यातील हणमंत पाणीपुरवठा संस्था तळाशी, इचलकरंजीतील कामगार बँक आदी संस्थांच्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एस.पाटील, असिफ फरास, ए.बी.माने, आर.जे.पाटील, जे.एम.शिंदे, व्ही.आर.मंदावते, के.डी.चव्हाण, ए.के.पाटील, ए.टी.उपाध्ये. टी.बी.पाटील यांच्यासह संबंधित तालुक्यांतील वसुली अधिकारी, निरीक्षक व अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
कोल्हापूर जिल्हा बँकेचे थकबाकीदारांविरुद्ध आंदोलन
प्रचंड थकबाकीवरून आर्थिक अडचणीत आलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासनाने बडय़ा थकबाकी संस्थांविरुद्ध सोमवारपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कोल्हापूर जिल्ह्य़ात ५० प्रमुख संस्थांकडे १५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. यापैकी प्रमुख संस्थांच्या कार्यालयासमोर बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.
First published on: 04-12-2012 at 04:41 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur district bank agitator against defaulters