तब्बल आठवडय़ाभरानंतर कोल्हापुरातील विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आलेले आहे. सोमवारी विनाव्यत्यय सर्वप्रकारचे व्यवहार सुरू राहिल्याने शहरातील चैतन्य पूर्वीसारखेच वाहू लागले आहे. थंडावलेल्या सार्वजनिक वाहतूक सेवेसह सर्व प्रकारच्या उपक्रमांना गती मिळाल्याचे आज दिसून आले.
ऊसदर आंदोलनामुळे गेल्या रविवारपासून कोल्हापुरातील वातावरण बिघडले होते. आंदोलकांच्या हिंसक प्रत्युत्तरामुळे अनेक व्यवहारांना मर्यादा आल्या होत्या. राज्य परिवहन महामंडळाची सेवातर विस्कळीत झाली होती. अनेक एसटींवर दगडफेक होऊन काहींची धावपळही झाली. त्यामध्ये एसटी महामंडळाला सुमारे २ कोटींचा फटका बसला होता. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही या घटनेचे पडसाद उमटले होते.
या कारवायांमुळे दिवाळीचा आनंदही घेता येणे कठीण बनले होते. अनेकांच्या दृष्टीने दिवाळी गोड ठरण्याऐवजी कडू ठरली होती. लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज यापैकी एकाही विधी परंपरेची जोपासना करताना नागरिकांना अक्षरश: कसरत करावी लागली होती.
शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असतानाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाचे वृत्त येऊन थडकले. त्यासरशी कोल्हापुरातील सर्व व्यवहार झटपट बंद झाले होते. तर काल सेनाप्रमुखांवर अंत्यसंस्कार असल्याने शहरी व ग्रामीण भागातील व्यवहार स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आले होते. सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता.
गेल्या आठवडय़ाभरातील या निराशाजनक परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर आज सोमवारी मात्र शहरातील सर्वप्रकारचे व्यवहार पूर्ववत झाले. ठप्प झालेली यंत्रणा गतिमान झाली. शासकीय कार्यालये, खासगी दुकाने, बाजारपेठा, बँका, हॉटेल, पर्यटन केंद्रे अशा सर्व ठिकाणी पूर्वीचीच सळसळ कायम राहिली. जणू आठवडाभर काही घडलेच नव्हते, अशा वातावरणात सर्वजण वावरत होते. ऊसदराचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागल्याने याचवेळी साखर कारखान्यांनी कारखाने सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्याने या आंदोलनाविषयी वाटणारी भीतीही पळून गेल्याचे दिसत होते. तथापि, नागरिकांच्या बोलण्यात मात्र सेनाप्रमुखांचे निधन व ऊसदर आंदोलन याची मात्र चर्चा सुरूच होती.    

Story img Loader