नववर्षाचे स्वागत करण्यासाठी करवीरनगरी सज्ज झाली आहे. मावळत्या वर्षांला निरोप देण्यासाठी शहरातील सर्वच हॉटेल्स मध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. खास मेनू, संगीतमयपार्टी, कँडल लाइट डिनर यांचे वैविध्य जपण्यात आले आहे. सहकुटुंब आनंद साजरा करता यावा यासाठी फॅमिली पॅकेजची सोयही करण्यात आली आहे.     
नववर्षांचे स्वागत आणि मावळत्या वर्षांला निरोप देण्यासाठी पार्टीचे आयोजन हा आता अलिखित नियमच बनला आहे. मित्रांसमवेत आणि कुटुंबीयांसमवेत अशा वेगवेगळ्या पाटर्य़ाचे आयोजनही केले जाते. नववर्षांच्या स्वागताची तरुणाईची धांदल लक्षात घेऊन हॉटेल चालकांनी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले आहे. हॉटेल्स सभोवती आकर्षक विद्युत रोषणाई करून ग्राहकांना आपल्याकडे खेचण्याची स्पर्धा लागली असल्याचे दिसत आहे.
ग्राहकांना वेगळेपण देण्यासाठी हॉटेलमध्ये थिम पार्टीचे आयोजन केलेले आहे. थिमच्या प्रकारानुसार त्यामध्ये सहभागी होणाऱ्यांसाठीचे दर निश्चित झालेले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास संगीताच्या तालावर थिरकण्याची तरुणाईची आवड लक्षात घेऊन डान्सफ्लोअरचे आयोजन करण्यात आलेले आहे. शाकाहारी, मांसाहरीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. थंडीच्या कडाक्यातही पार्टीनंतर आइस्क्रीम पुरविण्याची सोयही करण्यात आलेली आहे.
सात्त्विक पार्टी!
मटण विक्रेत्यांनी आपल्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १ जानेवारीपर्यंत मटणविक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नववर्षांचे स्वागत करताना मटणाच्या तांबडय़ा-पांढऱ्या रश्श्यावर ताव मारू पाहणाऱ्या खवय्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. शहर व परिसरात मटण मिळत नसल्याने दूर अंतरावर असलेल्या खेडेगावात धाव घेऊन मटण उपलब्ध करण्याची पराकष्ठा खवय्ये व हॉटेल चालकांकडून होताना दिसत आहे. मटण उपलब्ध नसल्याने चिकन व माशांना मागणी वाढली असून त्यांचा दरही चढाच आहे.