हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कोल्हापूर जिल्हय़ातील आमदारांनी ‘कोल्हापूरकर टोल देणार नाहीत’चा नारा दिला. सोमवारी त्यांनी टोलविरोधात आणि आयआरबी कंपनीच्या निकृष्ट कामाविरोधात विधान भवनाच्या दारात निदर्शने केली.    
कोल्हापूर शहरात बीओटी तत्त्वावर राबविण्यात आलेल्या रस्ते विकास प्रकल्पाबद्दल कोल्हापूरवासीयांवर जाचक टोल शासनामार्फत लादण्यात आला आहे. या टोलविरोधात कोल्हापूर शहर व ग्रामीण भागातील लोकांनी लढा उभा केला आहे. जनतेची दिशाभूल करून जनतेस लुबाडणा-या आघाडी सरकारच्या नेत्यांनो परत निवडणूक लढविणार की घरात बसणार, कोल्हापूरवासीय टोल देणार नाहीत अशा आशयाचे जॅकेट परिधान करून आमदार राजेश क्षीरसागर, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधान भवनात प्रवेश केला आणि अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ‘कोल्हापूरकर टोल देणार नाहीत’च्या ना-याने विधान भवन परिसर दणाणून सोडला. ते म्हणाले, लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर पोलीस प्रशासन संगनमताने लाठीमार करत आहे. नागरिकांनी टोल देण्यास विरोध केल्यास टोल वसूल करणा-या गुंडांकडून नागरिकांना मारहाण करण्यात येते. नागरिकांचे वाहनांचे नुकसान केले जाते, पण पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेते. कोल्हापूरच्या जनतेने टोल न देण्याचा निर्धार केला असून, शासनाने लोकभावना लक्षात घेऊन टोल रद्द केलाच पाहिजे, असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले. या वेळी आमदार के. पी. पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार एकनाथ शिंदे, आमदार चंद्रकांत मोकाटे, आमदार माधुरी पिसाळ, आमदार विजय देशमुख, आमदार सुधाकर भालेराव उपस्थित होते.
 

Story img Loader