* मेधा पाटकर यांची प्रकट मुलाखत
*‘महिलांच्या सामाजिक सुरक्षितते’वर विशेष चर्चा
कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे येत्या ८ ते १० नोव्हेंबर या कालावधीत सावंतवाडी येथे चौथे महिला साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांची प्रकट मुलाखत तसेच ‘महिलांच्या सामाजिक सुरक्षिततेचा प्रश्न’या विषयावर एका विशेष चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मेधा पाटकर यांच्याशी मीना कर्णिक संवाद साधणार आहेत. महिलांवरील वाढते अत्याचार, बलात्कार आणि हिंसाचारांच्या घटनांमुळे महिलांच्या सामाजिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संमेलनात याच विषयावर चर्चात्मक कार्यक्रम होणार असून यात विद्या बाळ, रमा सरोदे, मंगला आठलेकर, स्नेहजा रुपवते, सुवर्णा पत्की या विविध क्षेत्रातील महिला सहभागी होणार आहेत.
संमेलनातील विविध परिसंवाद आणि अन्य कार्यक्रमातून निरजा, मोनिका गजेंद्रगडकर, डॉ. नीला जोशी, उषा मेहता, अनुपमा उजगरे, संपदा जोगळेकर, मिताली मठकर, मनस्विनी लता रवींद्र आदी सहभागी होणार आहेत.