कोकणातील शेतकऱ्यांच्या बागेतून थेट वाजवी दरात हापूससह अन्य प्रकारचे आंबे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कोकण पर्यटन विकास संस्थेतर्फे येथे आयोजित आंबा महोत्सवाचे शुक्रवारी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मागील दोन ते तीन वर्षांच्या तुलनेत यंदा हापूसचे मुबलक उत्पादन झाले असल्याने त्याचे दरही काहिसे कमी झाले आहेत. यामुळे नाशिककरांना कमी दरात हापूसचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध झाल्याचे संयोजकांनी म्हटले आहे.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जुन्या मुख्यालयातील सभागृहात १३ मे पर्यंत हा कोकण आंबा महोत्सव सुरू राहणार आहे. त्यात कोकणातील सुमारे ३५ शेतकरी सहभागी झाले आहेत. महोत्सवाचे उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक यशवंत निकुळे, नगरसेविका सुजाता डेरे आदी उपस्थित होते. महोत्सवातील आंब्यांचा नूर पाहून महापौरांनी उत्पादकांना मनसेतर्फे आयोजित धान्य महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले. आंबा महोत्सवाचे हे नववे वर्ष असून मागील आठ वर्षांत नाशिककरांकडून त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे संयोजक दत्ता भालेराव यांनी सांगितले. या निमित्ताने ग्राहक व उत्पादक यांच्यात ऋणानुबंध निर्माण झाले आहेत. महोत्सवाचे आयोजन होण्यापूर्वी अनेक नागरिकांनी कोकणातील उत्पादकांशी संपर्क साधून नाशिकला कधी येणार याबद्दल विचारणा केल्याचे त्यांनी सांगितले. अस्मानी संकटामुळे मागील दोन ते तीन वर्ष हापूसच्या उत्पादनात घट आली होती. त्यामुळे त्याचे दर वधारले आणि सर्वसामान्यांच्या तो आवाक्याबाहेर गेला. यंदा मात्र, परिस्थितीत बदल झाला असून मुबलक उत्पादनामुळे तो किफायतशीर दरात उपलब्ध राहणार असल्याचे उत्पादकांकडून सांगण्यात आले. महोत्सवात हापूस, पायरी, केशर जातीचे आंबे उपलब्ध आहेत. सभागृहात खच्चून भरलेल्या आंब्यामुळे मुबलक उत्पादनाची साक्ष पटू शकते. २०० ते ६०० रूपये डझन असे हापूसचे दर आहे. चार ते आठ डझनच्या पेटीचे दर १८०० ते २४०० रूपयांपर्यंत असून त्यातही विक्रेत्यांकडून ३०० ते ४०० रूपयांची सवलत देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

Story img Loader