कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेवरून नियमित गाडी सुरू करण्यात यावी, ही मागणी दोन वर्षांत पूर्ण होणार आहे. पश्चिम रेल्वेवरील नायगाव-दिवा (जूचंद्र) वसई रोड मार्गाच्या सर्वेक्षणास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. हा मार्ग तयार झाल्यानंतर बोरिवलीहून थेट पनवेलसाठी दोन वर्षांत गाडी सुरू होऊ शकेल. यामुळे वांद्रे ते डहाणू या पट्टय़ातील कोकणवासीयांना आपल्या गावी जाण्याची सोपी सोय होणार आहे.
होळी, गणेशोत्सवानिमित्त आणि दिवाळीच्या हंगामात पश्चिम उपनगरातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी नियमित रेल्वे सुरू करावी अशी मागणी कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून सातत्याने करण्यात येत होती. केवळ कोकणच नव्हे तर वेलंकनीसाठीही पश्चिम रेल्वेवरून थेट गाडी सुरू करण्याची मागणी आहे. पश्चिम उपनगरातील कोकणवासीयांना केवळ एसटी महामंडळाच्या गाडय़ांचा आधार असून जादा गाडय़ाही सणासुदीच्या दिवसात अपुऱ्याच ठरतात. बोरिवलीच्या पुढे राहणाऱ्या कोकणवासीयांना कोकणात रेल्वेने जाण्यासाठी किमान तीन गाडय़ा बदलाव्या लागतात.
वांद्रे टर्मिनस येथून कोकणात विशेष गाडय़ा सोडण्यास गेल्या वर्षीपासून सुरुवात झाली. गेल्या वर्षी कोकणासाठी चार विशेष गाडय़ा पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस येथून सोडल्या होत्या तर वडोदरा आणि अहमदाबाद येथून वसई रोड मार्गे काही विशेष गाडय़ा सोडण्यात आल्या होत्या. पश्चिम रेल्वेवरून कायमस्वरूपी कोकणसाठी गाडी सुरू करण्यात यावी यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही मार्ग उपलब्ध नाही, असे कारण देण्यात येत होते. आता नायगाव-दिवा (जूचंद्र) वसई रोड मार्गाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश रेल्वेमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना दिले असून त्यासाठी निधीही मंजूर केला आहे. या सर्वेक्षणाच्या कामास जून महिन्यात सुरुवात होणार असून पुढील दोन वर्षांंमध्ये बोरिवली येथून नायगाव-दिवा वसईमार्गे कोकणात नियमित गाडी सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले.
मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनसपाठेपाठ बोरिवली आणि विरार येथे आणखी टर्मिनस उभारण्याची तयारी सुरू असून बोरिवली येथील पूर्वेकडील फलाटांवरून कोकणात जाणाऱ्या गाडय़ा सोडण्यात येतील. तर विरार येथून उत्तरेकडे आणि देशाच्या अन्य भागांसाठी आणखी गाडय़ा सुरू करण्यात येतील, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.
कोकण रेल्वे बोरिवलीहून.. पण जरा प्रतीक्षा करा..
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेवरून नियमित गाडी सुरू करण्यात यावी, ही मागणी दोन वर्षांत पूर्ण होणार आहे. पश्चिम रेल्वेवरील नायगाव-दिवा (जूचंद्र) वसई रोड मार्गाच्या सर्वेक्षणास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.
आणखी वाचा
First published on: 02-03-2013 at 12:41 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Konkan railway from borivali but wait