कोकण रेल्वे मार्गावर नव्या गाडय़ा सुरू करण्यात कोकण रेल्वेचाच अडथळा असून केवळ आर्थिक तोटा सहन करत मध्य रेल्वे जादा गाडी अथवा जादा डबे देण्यास उत्सुक नाही. कोकण रेल्वेकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही आणि आर्थिक लाभही नाही मग मध्य रेल्वेने तोटा सहन का करावा, असा प्रश्न मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी उपस्थित केला आहे. उन्हाळ्याच्या सुटीत कोकण रेल्वेवर प्रचंड गर्दी होत असूनही कोकण रेल्वेने जादा उन्हाळी गाडय़ांसाठी अथवा विद्यमान गाडय़ांना जादा डबे जोडण्यासाठी मागणीच केलेली नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.
कोकणात जाणाऱ्या बहुतांश गाडय़ा मध्य रेल्वेकडून चालविल्या जातात. अन्य रेल्वेकडून कोकणमार्गे दक्षिणेकडे जाणाऱ्या गाडय़ा या कोकण रेल्वेच्या म्हणून ओळखल्या जातात. रोह्याच्या पुढे कोकण रेल्वेची हद्द सुरू होते. आम्हाला रोह्याच्या पुढे आर्थिक फायदा होत नसल्याने आणि कोकण रेल्वेला रोह्याच्या पुढील सर्व व्यवहारामध्ये ५० टक्के रक्कम द्यावी लागत असल्याने आम्हाला तोटाच होतो, असे जैन यांनी सांगितले. असे असूनही आम्ही दादर-सावंतवाडी गाडीला १ मार्चपासून दोन अतिरिक्त डबे लावले आहेत. उन्हाळी विशेष गाडय़ांमध्येही आम्ही तोटा सहन करून गाडय़ा चालवत असतो. मात्र त्यासाठी किंवा जादा डबे जोडायचे असतील तर कोकण रेल्वेकडून परवानगी घ्यावी लागते. या अगोदर विशेष गाडय़ा सुरू करताना कोकण रेल्वे व्यवस्थापनाकडून त्रास झाल्याचे महाव्यवस्थापकांनी सांगितले.
दरम्यान, कोकण रेल्वे महामंडळाकडून उन्हाळी विशेष गाडय़ांसाठी जादा गाडय़ा किंवा जादा डब्यांची मागणी अद्याप झाली नसल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. कोकण रेल्वे महामंडळाकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मध्य रेल्वेला मिळत नसल्याने सध्या तरी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना सध्या आहेत त्याच गाडय़ांनी प्रवास करणे अपरिहार्य ठरले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा