कोकणातल्या प्रवाशांच्या साध्या तक्रारींची दखल घेण्याचीही तयारी नसलेल्या मध्य रेल्वेला केवळ उत्तरेकडे जाणाऱ्या गाडय़ांचीच जास्त काळजी आहे, अशा शब्दांमध्ये कोकण रेल्वेने मध्य रेल्वेवर पलटवार केला आहे.
कोकण रेल्वेच्या मार्गावर गाडय़ा चालविण्यामध्ये मध्य रेल्वेला आर्थिक फायदा होत नाही आणि तेथील फलाटांची लांबी पुरेशी नसल्याने कोकणातील गाडय़ांचे डबे वाढविता येत नाहीत. त्याचप्रमाणे कोकण रेल्वे सहकार्य करत नसल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी जाहीरपणे सांगितले होते. मात्र मध्य रेल्वेला केवळ उत्तरेकडे जाणाऱ्या गाडय़ा चालविण्यात रस असून अपयशाचे खापर कोकण रेल्वेवर फोडण्याचा प्रयत्न मध्य रेल्वे करत असल्याचे कोकण रेल्वे महामंडळाचे म्हणणे आहे. गाडय़ा किंवा डबे वाढविण्याबाबत वारंवार कोकण रेल्वेने मध्य रेल्वेशी पत्रव्वहार केला असून त्या पत्रांची साधी दखलही मध्य रेल्वे प्रशासनाने घेतलेली नाही, असाही कोकण रेल्वेचा आरोप आहे.
कोकण रेल्वेच्या गाडय़ा नेहमी मध्य रेल्वेच्या मुख्यालयापासून सोडण्यात येतात किंवा त्यांचा प्रवास तेथपर्यंत असतो. त्यामुळेच या गाडय़ांमधील प्रवाशांच्या शिफारशी अथवा तक्रारींची दखल मध्य रेल्वेकडेच पाठवली जाते. ३० ऑगस्ट २०१० रोजी कोकण रेल्वेने छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मंगलोर सुपरफास्ट एक्स्प्रेस गाडीचे डबे वाढविण्यासाठी पत्र पाठविले होते. १३ एप्रिल २०११ रोजी दादर-सावंतवाडी विशेष गाडी तसेच जनशताब्दी एक्स्प्रेसचे डबे वाढविण्याबाबत पत्र पाठविण्यात आले होते. २० जून २०११ रोजी राज्यराणी एक्स्प्रेसचे डबे १२ वरून १७ करण्यात यावेत असेही पत्र पाठविण्यात आले होते. मात्र या पत्रांची कोणतीही दखल मध्य रेल्वेने घेतली नाही. उलट त्याचवेळी उत्तरेकडे जाणाऱ्या गाडय़ांचे डबे वाढविण्याबरोबरच पुण्याहूनही विशेष गाडय़ा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र प्रवाशांचे नेहमीच हसतमुखाने स्वागत करणाऱ्या कोकण रेल्वेने केलेल्या शिफारशींचीही दखल मध्य रेल्वेने घेतलेली नाही, असे कोकण रेल्वेचे म्हणणे आहे.
कोकण रेल्वेने मध्य रेल्वेला नेहमीच सहकार्य केले आहे. कोकण रेल्वेच्या गाडय़ा सीएसटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि दिवा या मध्य रेल्वेच्या स्थानकावरून सुटत असल्याने मध्य रेल्वेवरच कोकण रेल्वे अवलंबून आहे. असे असूनही कोकण रेल्वे सहकार्य करत नाही, असे म्हणणे म्हणजे चोराच्या उलटय़ा बोंबा आहेत, असे कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्काधिकारी सिद्धेश्वर तेलुगू यांनी सांगितले. यासंदर्भात कोकण रेल्वेने १४ मार्च रोजी मध्य रेल्वेला एक पत्रही पाठविले असल्याचे त्यांनी सांगितले.
मध्य रेल्वेने अलिकडेच डबे वाढविलेल्या गाडय़ा
सीएसटी-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस, सीएसटी-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस (मुंबई-बल्लारशा दरम्यान एक जादा डबा), पुणे-भुसावळ एक्स्प्रेस, पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-वाराणसी एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-अलाहाबाद तुलसी एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-लखनौ एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-आग्रा छावणी लष्कर एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-प्रतापगड उद्योगनगरी एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-हबाबीगंज एक्स्प्रेस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस-अमृतसर एक्स्प्रेस.

Story img Loader