होळीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष गाडय़ा सोडणाऱ्या मध्य रेल्वेने या गाडय़ांना दिवा स्थानकात थांबा न दिल्याबद्दल प्रवाशांच्या मनात असंतोषाचे वातावरण आहे. या विशेष गाडय़ांपैकी किमान दोन गाडय़ांना तरी दिवा स्थानकात थांबा द्यायला हवा होता. मात्र रेल्वे प्लॅटफॉर्मचे कारण पुढे करत या गाडय़ांना दिवा स्थानकातील थांबा नाकारत आहे, असे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे. या गाडय़ा दिवा येथे थांबल्यास डोंबिवली, कल्याण आणि त्यापुढील प्रवाशांना त्याचा फायदा होईल, असे या संघटनांचे म्हणणे आहे.
होळी, गणेशोत्सव आणि उन्हाळी सुटी अशा विशेष निमित्ताने कोकणातल्या आपल्या गावी जाणाऱ्या मुंबईतील चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वे विशेष गाडय़ा चालवते. या गाडय़ा कोकण रेल्वेमार्गावरून थेट गोव्यापर्यंत चालवल्या जातात. लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर किंवा मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सुटणाऱ्या या गाडय़ा दादर आणि ठाणे यानंतर थेट पनवेलला थांबतात. दिवा स्थानकातील प्लॅटफॉर्म मेल-एक्सप्रेस गाडय़ांसाठी योग्य नसल्याने येथे या विशेष गाडय़ांना थांबा देणे शक्य होत नसल्याचे रेल्वेतील काही अधिकारी सांगतात. मात्र, दिवा स्थानकातून दिवा-सावंतवाडी पॅसेंजर गाडी सुटते. त्याचप्रमाणे दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडीही दिवा येथे थांबते. या गाडय़ा दिवा येथे थांबू शकतात, मग विशेष गाडय़ांची बांधणी काही वेगळी आहे का, असा प्रश्न काही प्रवासी संघटनांनी उपस्थित केला. तसेच दिवा स्थानकातील हा प्लॅटफॉर्म मुख्य मार्गाच्या चारही मार्गिकांपासून वेगळा आहे. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवर गाडी थांबली, तरी त्याचा परिणाम मुख्य मार्गावरील लोकल अथवा लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या वेळापत्रकावर होत नाही. असे असूनही रेल्वे दिवा येथे या गाडय़ांना थांबा का देत नाही, अशी शंका प्रवासी संघटना उपस्थित करतात.
कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, आसनगाव, डोंबिवली, टिटवाळा येथील लोकांना ठाण्याला जाण्यापेक्षा दिव्याहून गाडी पकडणे अधिक सोयिस्कर आहे. गर्दीच्या मोसमात दर दिवशी दीड हजारांहून जास्त लोक या उपनगरांतून कोकणाकडे जातात. त्यामुळे त्यांना दिवा स्थानक सोयीचे ठरणार आहे. त्याचप्रमाणे ठाण्याला जमणाऱ्या गर्दीचा विचार करता या गाडय़ांना दिवा येथे थांबा दिल्यास गर्दी विभागली जाईल, असेही या संघटनांचे म्हणणे आहे

Story img Loader