अक्कलकोट तालुक्यातील शेगाव येथे घडलेल्या भीमण्णा कोरे खून खटल्यातील संशयित आरोपी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे अखेर अक्कलकोट येथील न्यायालयात हजर झाले. त्यावर येत्या १९ नोव्हेंबर रोजी सोलापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात म्हेत्रे यांनी हजर राहण्याचा आदेश न्यायदंडाधिकारी केदार कुलकर्णी यांनी दिला.
मागील २००९ साली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या विरोधात भाजपचे त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आमदार सिद्रामप्पा पाटील हे उभे होते. त्या वेळी शेगाव येथे प्रचारासाठी सिद्रामप्पा पाटील हे असता त्यांच्या सभेच्या वेळी म्हेत्रे समर्थकांनी सशस्त्र हल्ला केला.
यात आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे सहकारी भीमण्णा कोरे यांचा गोळी लागून मृत्यू झाला. या प्रकरणी म्हेत्रे व त्यांचे बंधू शंकर म्हेत्रे यांच्यासह २९ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. परंतु सिद्धाराम म्हेत्रे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन आपणास आरोपमुक्त करण्याची विनंती केली होती. त्यानुसार सुनावणी होऊन म्हेत्रे यांना पोलीस तपासावर ठेवण्यात आले होते.
दरम्यान, याप्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयडी पथकाने आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले व या खटल्याची सुनावणीही सोलापूरच्या सत्र न्यायालयात सुरू झाली असताना अखेर सिद्धाराम म्हेत्रे यांनाही न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले.

Story img Loader