जलसंपदा विभागात चाऱ्या दुरूस्तीच्या नावाखाली कोटय़वधी रुपयांचा गफला झाला आहे. अनेकदा तक्रारी करूनही उपयोग होत नव्हता. आता सिंचनावरील श्वेतपत्रिका तयार करण्याचे काम सुरू झाले. त्यामुळे छावा संघटनेने केलेल्या आंदोलनाची दखल दोन वर्षांनंतर घ्यावी लागली असून सुमारे ४० लाख रुपये खर्चाच्या कारेगाव येथील तीन चाऱ्यांच्या अर्धवट अवस्थेत सोडून दिलेल्या कामांना आता मात्र प्रारंभ झाला आहे.
प्रवरा डावा कालव्याच्या कारेगाव शिवारातील चारी क्रमांक ३५, ३६ (अ) व ३६ (ब) यांच्या नूतनीकरणासाठी २००९-१० मध्ये ३९ लाख १३ हजारांचा निधी मंजूर झाला. हे काम हनुमान मजूर संस्थेने घेतले. पण काम अर्धवट टाकले. कामावरील निधीचा गैरप्रकार होण्याची शक्यता असल्याने दोन वर्षांपूर्वी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे, संजय जगताप, मनोज आसणे, विशाल आदीक, बाबासाहेब पटारे, मच्िंछद्र बेरड, अमोल पटारे, युवराज जगताप, राजेंद्र जगताप आदींनी आंदोलने केली. सलग तीन वर्षे या प्रश्नावर अनेकदा त्यांनी धरणे आंदोलने केली. अखेर नगरच्या जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला.
आता श्वेतपत्रिका काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे छावाच्या आंदोलनाची दखल अधिकऱ्यांना घ्यावी लागली. उपअभियंता शरद गडाख यांनी कारेगाव येथे समक्ष भेट दिली. त्यानंतर उपअभियंता एस. के. थोरात यांनी कामाचा आढावा घेतला. छावाच्या तक्रारीत तथ्य असल्याने काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. आता कामास नुकताच प्रारंभ झाला आहे. आवर्तनापूर्वी काम पूर्ण करण्याचे हनुमान संस्थेनेही कबूल केले आहे.
दरम्यान, कारेगाव शिवारातील चारी क्रमांक ११ व १२ च्या नूतनीकरणाचा २८ लाख रुपयांचा प्रस्ताव आहे. पण तत्पूर्वी शेतकऱ्यांची अडचण होऊ नये म्हणन तात्पुरती दोन्ही चाऱ्यांची दुरूस्ती करण्याचे आश्वासन उपअभियंता थोरात यांनी छावाचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांना दिले आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या दणक्यामुळे तालुक्यात प्रथमच कारेगाव शिवारातील चाऱ्या
दुरूस्त होत आहेत. निधीची गळती थांबणार असून गैरप्रकाराचे भोकेही बुजतील.    

Story img Loader